Sushma Andhare : सुषमा अंधारेंची आज राणेंच्या बालेकिल्ल्यात सभा, पोलिसांच्या नोटिसा अन् तणावपूर्ण शांतता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ नोव्हेंबर । शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या कणकवलीतील ( Sushma Andhare Rally In Kankavli ) सभेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कणकवलीतील सर्व नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. सुषमा अंधारे यांच्यासभेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे ( Narayan Rane ) यांचा हा बालेकिल्ला आहे. नारायण राणे सध्या हे दिल्लीत आहेत. तर त्यांचे पुत्र निलेश राणे आणि नितेश राणे हे दोघेही जिल्ह्याबाहेर, असल्याचं सांगण्यात येत आहे.

शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सध्या राज्यभर सभा सुरू आहेत. महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने अंधारे या राज्यभर सभा घेत असून त्यातून बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट आणि भाजप यांच्यावर सडकून टीका करत आहेत. सुषमा अंधारे यांनी आपल्या खास शैलीतून आतापर्यंत अनेक नेत्यांचा समाचार घेतला आहे. कोकणातील भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर देखील त्यांनी आपल्या सभेमधून वेळोवेळी टीका केली आहे.

सुषमा अंधारे या आज राणेंच्याच बालेकिल्ल्यात म्हणजे कणकवली येथे येत आहेत. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कणकवली श्रीधर नाईक चौक परिसरात त्यांची सभा होत आहे. या सभेमधून अंधारे या निश्चितपणे नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी कणकवली पोलीस निरीक्षकांची भेट घेतल्याचे समजते. अंधारे यांनी आपल्या नेतृत्वावर टीका केली तर आम्ही ते सहन करणार नाही, अशी भूमिका देखील भाजप पदाधिकाऱ्यांनी पोलिसांसमोर मांडल्याची माहिती समोर येत आहे.

सुषमा अंधारे यांच्या सभेच्या निमित्ताने कणकवलीत ५४ पोलीस कर्मचारी आणि ११ पोलीस अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संजय कांबळे आणि कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी सभेच्या ठिकाणी परिस्थितीचा आढावा घेतला आहे. दंगल नियंत्रण पथक देखील सज्ज ठेवण्यात आले असून अखेरच्या क्षणी ते देखील कणकवली तैनात करण्यात येऊ शकते, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. कणकवली हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील शहर असल्याने या ठिकाणी प्रशासनाने सतर्कता बाळगली आहे. सुषमा अंधारे या कणकवलीत आल्यानंतर कणकवली एसटी बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या ठिकाणावरून रॅलीने त्या पाचशे मीटर अंतरावर असलेल्या सभेच्या ठिकाणी दाखल होणार आहेत.

जिल्ह्यात सध्या राजकीय वातावरण तापले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी आधीच मनाई आदेश लागू केले आहेत. तर कणकवलीमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आज सोमवारी कणकवलीत होणाऱ्या अंधारे यांच्या सभेच्या निमित्ताने सभेपूर्वीच ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांच्यासह कणकवली आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या नेत्यांना सी.आर.पी.सी. १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला असून त्याचा भंग होऊ नये, अशा सूचना या नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. तसेच जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता देखील लागू असून त्याचाही भंग होता कामा नये, अशा सक्त सूचना या नोटिशीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *