संभाजीराजे छत्रपतींचा फडणवीसांना सवाल : राज्यपाल, सुधांशू त्रिवेदींची पाठराखण का करताय?; दोघांना माफी मागायला लावा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ नोव्हेंबर । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची पाठराखण का करीत आहेत?, असा संतप्त सवाल संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जात आहे, असे म्हणत फडणवीसांनी राज्यपालांची पाठराखण केली आहे. तसेच, भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे वक्तव्य केलेच नाही, असेही फडणवीस म्हणाले. त्यावर संभाजीराजेंनी संताप व्यक्त करत दोघांची पाठराखण करण्यापेक्षा त्यांना माफी मागायला लावा, असे फडणवीसांना उद्देशून म्हटले आहे.

मलाही प्रश्न पडला

संभाजीराजे म्हणाले, राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जे काही वक्तव्य केले आहे, त्याचे समर्थन करणे, राज्यपालांना पाठीशी घालणे योग्य नाही. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहे. तरीही ते राज्यपालांना पाठीशी का घालत आहेत, हा मलाही पडलेला प्रश्न आहे.

भेटल्यावर त्यांना विचारणार

तसेच, भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी चॅनेलवर शिवाजी महाराजांबाबत जे वादग्रस्त वक्तव्य केले आहे, त्याबाबत माफी मागितलीच पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांना भेटेल तेव्हा तुम्ही या दोघांची पाठराखण का करीत आहात?, असा प्रश्न त्यांना विचारणार आहे, असे संभाजीराजेंनी सांगितले. तसेच, राज्यपाल व सुधांशू त्रिवेदी यांनी सर्वच शिवप्रेमींची माफी मागायला पाहिजे. फडणवीसांनी त्यांचे समर्थन केल्यापेक्षा ते माफी कशी मागतील, याकडे लक्ष द्यायला पाहिजे, असा सल्लाही संभाजीराजेंनी दिला.

फडणवीस नेमके काय म्हणाले होते?

फडणवीस मुंबईतील एका कार्यक्रमात फडणवीस म्हणाले होते की,, जगात चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे आणि देशातील सगळ्यांचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज हेच राहणार आहेत. आजच्या भाषेत बोलायचे तर आमचे आजचे हीरो हे शिवाजी महाराज हेच आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात आले. पण त्यांचा मनात तसा कुठलाही भाव नव्हता. सुधांशू त्रिवेदी यांनी कुठेही ‘शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली’ असा उल्लेख केला नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या वक्तव्यांवर संभाजीराजे छत्रपतींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *