” दहशतीविरोधात आवाज बुलंद केला पाहिजे”; राणेंच्या बालेकिल्ल्यातून सुषमा अंधारेंचा थेट निशाणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ नोव्हेंबर । सुषमा अंधारे यांची महाप्रबोधन यात्रा आज नारायण राणे (Narayan Rane) यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे सिंधुदुर्गात पोहोचत आहे. सुषमा अंधारे यांची कणकवलीत सभा झाली. सभेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना सीआरपीसी कलम 149 अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस दिली होती. आमदार वैभव नाईक यांच्यासह ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना ही नोटीस देण्यात आली होती.

“पोलिसांनी नोटीसा देणं फार एक्स्पेक्टेड आहे. कारण ‘जिस्की लाठी, उसकी भैस होती है’, जर सत्ता त्यांच्या हातात असेल तर सत्तेचा गैरवापर किती अतिरेकी पातळीवर करायचा, हेसुद्धा त्यांच्याच हातात आहे. मला वाटतं भाजप अत्यंत सूडबुद्धीनं वागत आहे आणि ती अतिरेकी पातळीनं करतं. वाईट याचं वाटतं या सगळ्यांमध्ये एकनाथ भाऊंच्या हातात काहीच नाही.”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

“राणेंचे कार्यकर्ते अटकाव करायला आलेले, नंतर मला कळलंच नाही ते कुठे गायब झाले. आम्ही कधीच कोणावर वैयक्तिक टीका करत नाही. जे करतो ते आम्ही अजेंड्यावर बोलतो आणि छातीठोक बोलतोय. त्यामुळे मी इथे धडक धडक तुम्हाला सगळे व्हिडीओ दाखवून सांगितलं की, काय पद्धतीनं राणेंचं राजकारण गलिच्छ पातळीवर चालतं. मुळात कुठलाही वैचारिक पाया नसलेली राणेंची बारकी दोन पोरं, ज्या पद्धतीनं बोलतात आणि लोकांना भासवण्याचा प्रयत्न करतात.”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. “नारायण राणे यांची बारकी लेकरं दहशतवाद माजवत गेली, श्रीधर नाईक, सत्यविजय भिसे यांची हत्या कोणी केली? हे वेगळं सांगायची गरज नाही.” असा जोरदार टोलाही त्यांना सिंधुदुर्गात लगावला. तसेच, राणे कुटुंबीयांवर टीका करताना त्यांना बाप वळण लावणारा असेल तर मुलांना वळण लागतं, अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली.

“हेतू हा आहे की, कधीकाळी जो सिंधुदुर्ग मधू दंडवते, बॅरिस्टर नाथ पै किंवा गोपाळराव दुखंडे साहेब किंवा श्रीधर नाईक साहेबांच्या नावानं ओळखला जायचा. अत्यंत विवेकशील असणारा हा जिल्हा, जर आज राणे कुटुंबामुळे अत्यंत दहशतीखाली जगत असेल आणि गुंडागर्दीचं राज्य इथे होत असेल. तर या दहशतीच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे. आज महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं आम्ही नेमकं तेच केलंय.”, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी थेट राणे पिता-पुत्रांवर निशाणा साधलाय.

सुषमा अंधारेंनी भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ यांच्यावरही थेट निशाणा साधलाय. त्या म्हणाल्या की, “चित्रा वाघ बिचाऱ्या तणावात आहेत असं वाटतं. एवढे कष्ट घेतल्यावर भाजप त्यांना काहीतरी देईल असं त्यांना वाटतंय. पण भाजपनं ज्या अर्थी त्यांची आमदारकी डावलेले आहे, त्यामुळे त्याबद्दल त्या पद्धतीनं बरळत राहतात. या त्याच चित्रा वाघ आहेत, ज्या संजय राठोड यांच्या प्रकरणात चपला मारण्याची भाषा करत होत्या. आता मात्र त्यांना ते प्रकरण थांबलं असं वाटतं. परंतु दुसरा प्रश्न मग निर्माण होतो की, मग चित्रा यांनी त्या गोरमाटी समाजातल्या एका गरीब लेकीची अब्रू तुम्ही चव्हाट्यावर आण्याचा प्रयत्न केला. यासाठी तुम्हाला कोणी जबाबदार धरायचं? मनावर घेण्यासारखं नसतं आणि त्या फक्त आणि फक्त भाजपची बांधील राहून बोलतात. कारण या त्या चित्रा वाघ आहेत. ज्या भाजपच्या सोलापूर जिल्हाध्यक्षांसोबत एका मायमाऊलीनं हॉटेलमधून व्हिडीओ स्वतः तयार करून आपलं स्टेटस ओपन करून सांगितलं होतं, त्यावर त्या गप्पा होत्या. राहुल शेवाळेंच्या संदर्भात एक बाई व्हिडीओ वारंवार पोस्ट करून करून न्याय मागतेय, त्यावरही त्या गप्पा आहेत. बिलकीसच्या आरोपींना मिठाई भरवली गेली, तेव्हाही त्या गप्प होत्या. त्यामुळे अशा ज्या काही राजकीय रोजगार हमी योजनेचे मजूर म्हणून वापरले जाणारे जे काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्यावर मला फार बोलावसं वाटत नाही.”

“या देशामध्ये स्वातंत्र्यलढा लढताना किती गुन्हे दाखल झाले, लोक हसत हसत फासावर गेले. एका अर्थानं आम्ही हे दुसरं स्वातंत्र्य युद्धचं लढत आहोत. हे स्वातंत्र्य युद्ध इथल्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी आहे. इथली महागाई, इथली बेरोजगारी आणि इथला महिला सुरक्षिततेचा प्रश्न आणि भाजपचा स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर, जी मजोरशाही चालू आहे. या मुजोरशाही विरोधातलं हे स्वातंत्र्य युद्ध आहे. त्यामुळे असे काही गुन्हे दाखल झाले तरी आम्ही त्याला सामोरे जायला तयार आहोत.”, असं म्हणत सुषमा अंधारेंनी भाजपला थेट आव्हानच दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *