Maharashtra Vs Karnataka: टाचणीभरही जमीन कर्नाटकात जाणार नाही; मुख्यमंत्री बोम्मईंना भाजपचा घरचा आहेर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २४ नोव्हेंबर । जत तालुक्यातल्या 40 गावांचा वाद ताजा असतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी (Basavaraj S Bommai) आता सोलापूर आणि अक्कलकोटवरही दावा सांगितल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आता महाराष्ट्र भाजपने सडेतोड उत्तर दिलं आहे. भाजपच्याच मुख्यमंत्र्याला भाजपनेच घरचा आहेर दिला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोम्मई (Basavraj Bommai) यांना सडेतोड उत्तर दिलं आहे.महाराष्ट्रातील टाचणीभरही जमीन जाऊ देणार नाही असं बावनकुळे म्हणाले आहेत. (Chandrashekhar Bawankule Latest News)

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, कर्नाटकातही अनेक जण मराठी बोलतात. एक टाचणीही जमीन कर्नाटकात जाणार नाही. महाराष्ट्र सरकार मजबूत आहे, आम्ही टाचणीभरही जमीन देणार नाही असं बावनकुळेंनी बोम्मईंना ठणकावून सांगितलं आहे.

त्याचप्रामाणे मविआचं अडीच वर्षे सरकार होतं तेव्हा, महाविकास आघाडी फुटली. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या हुकुमशाही वागण्यामुळे असं झालं असा आरोपही बावनकुळेंनी केला.

तसेच उद्धव ठाकरे हे आमदारांना रेडे म्हणतात, रेडे म्हटल्यावर राहिलेले आमदार तरी राहणार का? असा खोचक सवाल उपस्थित करत महाविकास आघाडीला उमेदवार मिळणार नाही अशी स्थिती होईल असं भाकित बावनकुळेंनी केलं आहे.

यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरही भाष्य केलं आहे. ८ ते १३ डिसेंबर मराठवाडा दौरा करणार असल्याचं बावनकुळेंनी सांगितलं.तसेच नांदेड, सोलापूर, उस्मानाबाद, बीड मराठवाडा दौरा करणार असून, हिंगोली, बुलडाणा, शेगाव येथेही जाणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी मराठवाडा दौऱ्यादरम्यान कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे अनेक पक्षप्रवेश होणार असल्याची त्यांनी माहिती दिली.

कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा कुठलाही प्रभाव झाला नाही असं म्हणत राहूल गांधी महाराष्ट्रात असताना कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलाय असा टोला बावनकुळेंनी लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *