एका दिवसासाठी माझ्याकडे CBI-ED सोपवा; अर्धा भाजप तुरुंगात जाईल; केजरीवालांचा हल्लाबोल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । दिल्लीत एमसीडी निवडणुकांची (Delhi MCD Election) रणधुमाळी सुरु आहे. निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. गेल्या 15 वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे आणि ती सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पार्टीचं (Aam Admi Party) कडवं आव्हान आहे. दरम्यान, आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल, असं म्हणत अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा मोठा आरोप केला आहे. ते म्हणाले की, आम्ही एमसीडीला गेल्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये दिले, पण या लोकांनी सर्व पैसे खाऊन टाकले. हे लोक भरपूर पैसे खातात. यांनी थोडंतरी काम केलं असतं, तरी कर्मचाऱ्यांना पगार मिळाला असता.

भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळले

सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, “एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, निम्मे भाजप तुरुंगात जाईल. त्यांच्याकडे तपास यंत्रणा आहेत. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, तरीही काहीही सिद्ध होऊ शकलं नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषनं दारू घोटाळा केला, 10 कोटी खाल्ल्याचं त्यांचं म्हणणं आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग 10 कोटी रुपये गेले कुठे?”

मोरबी पूल दुर्घटनेवर भाजपनं घातलाय घेराव

मोरबी पूल दुर्घटनेवरून भाजपला घेरताना केजरीवाल म्हणाले की, “हेच खरे भ्रष्टाचारी आहेत. गुजरातमध्ये त्यांनी घड्याळ बनवणाऱ्या कंपनीला पूल बांधण्याचं कंत्राट दिलं. जगात कुठेही असं काही पाहिलेलं नाही. फक्त एका दिवसासाठी सीबीआय-ईडी आमच्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल.”

सत्येंद्र जैन यांच्याबद्दल काय म्हणाले केजरीवाल?

तिहार तुरुंगातून व्हायरल झालेल्या दिल्ली सरकारमधील मंत्री सत्येंद्र जैन यांच्या व्हिडीओवर केजरीवाल म्हणाले की, “त्यांना कोर्टात दिलं होतं, पण कोर्टानं कोणताही आदेश दिलेला नाही. म्हणजे त्यांना ज्या सुविधा मिळत आहेत, त्या जेल मॅन्युअलनुसार आहेत. भाजपवर आरोप करताना ते म्हणाले की, “अमित शहा 2010 मध्ये तुरुंगात गेले, तेव्हा त्यांच्यासाठी तिथे डिलक्स जेल बांधण्यात आलं होतं. कारागृहात त्यांचं जेवण बाहेरून यायचं. ते डिलक्स सुविधा घ्यायचे, त्यामुळे प्रत्येकजण घेत असावा असं त्यांना वाटतं.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *