उपमुख्यमंत्री फडणवीसांसह भगतसिंह कोश्यारी दिल्ली दौऱ्यावर; शिवरायांबद्दलचे वक्तव्य भोवणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २५ नोव्हेंबर । महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेले आक्षेपार्ह वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भोवण्याची शक्यता निर्माण झालीय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भगतसिंह कोश्यारी आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठीत कोश्यारींच्या बदलाबाबत चर्चा होण्याची शक्यताय.

कोश्यारींच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उभ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळलीय. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरून निदर्शने केली. त्याची धग दिल्लीपर्यंत पोहचलीय.

इथून झाली सुरुवात…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डॉक्टरेटने गौरवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य करत शिवरायांची तुलना उपस्थित पाहुण्यांशी केली. ते म्हणाले, आम्ही जेव्हा हायस्कूलमध्ये शिकायचो. तेव्हा आमचे शिक्षक विचारायचे, तुमचा फेवरेट हिरो कोण. त्यावेळी कोणाला सुभाषचंद्र, कोणाला नेहरूजी, कोणाला गांधीजी चांगले वाटले. तुम्हाला कोणी विचारले, तुमचा फेवरेट हिरो कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या काळातला विषय. मी नव्या काळाबद्दल बोलतोय. ते येथेच मिळतील. डॉ. आंबेडकर, डॉ. गडकरी, पवार हेच सध्याचे आदर्श असल्याचे कोश्यारी म्हणाले. यावरून वाद सुरू झालाय.

दिल्लीला पाठवा…

कोश्यारींच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात जोरदार पडसाद उमटतायत. युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपाल असे का बोलतात मला समजत नाही. त्यांना महाराष्ट्राबाहेर पाठवून द्या, अशी हात जोडून पंतप्रधानांना विनंती केलीय. तसेच महाराष्ट्राचे वैभव धुळीस मिळवणारी व्यक्ती नकोय. त्यांच्या मनात घाणेरडा विचार येतोच कसा, असा सवाल केलाय.

मोदी, शहांना पत्र…

उदयनराजे भोसले यांनीही कोश्यारींच्या वक्तव्याबद्दल पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केलाय. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जुना झाला, हे वाक्य राज्यपालांच्या तोंडून ऐकून मी सुन्न झालो. त्या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार, नितीन गडकरीही होते. त्यांनी महापुरुषांच्या अपमानाबाबत आपल्या भाषणात भूमिका मांडणे आवश्यक होते. राज्यपालांना आणि शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे म्हणणाऱ्या सुधांशू त्रिवेदीला पदावरून हटवावे, या मागणीसाठी आपण पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिल्याची माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *