महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ नोव्हेंबर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आमदारांसह आज गुवाहाटीला (Guwahati) जात आहेत. थोड्याच वेळात ते आमदारांसह मुंबई विमानतळावरुन गुवाहाटीच्या दिशेनं रवाना होणार आहेत. आमदारांसह खासदारही गुवाहाटीला जाणार आहेत. तिथे जाऊन सर्व आमदार कामाख्या देवीचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे.
शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठलं होतं. तिथं त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात आहेत. अगदी थोड्याच वेळात एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह आज मुंबईहून गुवाहाटीला रवाना होणार आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटीची चांगलीच चर्चा आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं. मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्याही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.
शिंदे गटाचे मंत्री, आमदार आणि खासदार मुंबई विमानतळावर दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी एबीपी माझाने काही नेत्यांनी संवाद साधला. आम्ही कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहोत. आम्हाला याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदार सदा सरवणकर यांनी दिली. दोन तीन महिन्यात सरकारनं चांगल कामं केलं आहे. आमच्या मागे देवीचे आशिर्वाद असल्याचे सरवणकर म्हणाले. आम्ही जे काम केलं आहे ते चांगलं केलं आहे. आम्हाला आनंद वाटत असल्याचे मत शिंदे गटाचे आमदार संजय सिरसाट यांनी व्यक्त केलं. कोणतेही आमदार नाराज नाहीत, त्याबाबत चुकीची चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले. आज सर्वांच्या मतदारसंघात निधी मिळत आहे. कामं होत आहेत. दरम्यान, पुढच्या सात आठ दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाबाबात शिंदे साहेब निर्णय घेतील असेही सिरसाट म्हणाले.
देवाचं दर्शन घेणं यामध्ये चुकीचं काही नाही. विरोधकांकडे काही मुद्दे शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळ ते टीका करत असल्याचे मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. ठाकरे गटात उरलेल्या आमदार आणि खासदारांनाही लवकरच आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ असं वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केलं. ते आता आले असते तर त्यांना आम्ही घेऊन गेलो असतो. पण पुढच्या वेळेस आम्ही त्यांनी गेऊन जाऊ असे गवळी म्हणाल्या.