महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । मी नाराज नाही. नाशिक कृषिथाॅन कार्यक्रम ठरला असल्यामुळेच मी कामाख्या देवीच्या दर्शनाला गेलाे नाही. मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त लवकरच निघणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराची यादीही तयार केल्याचा दावा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.
सत्तार यांनी यावेळी पुन्हा उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, रश्मीताई ठाकरेंना मुख्यमंत्री केले असते तर जनतेची कामे झाली असती असे अनेकवेळा सांगितले. उद्धव ठाकरे अडीच वर्षांमध्ये फक्त चारवेळा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसले. मंत्री असूनही आम्ही त्यांना कधी मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेले पाहिले नाही, अशी टीकाही केली. अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्यामुळे शिवसेनेत आलो हाेताे, असे सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनगटात जाेर सिन्नरमध्ये एका कार्यक्रमानिमित्ताने आलेल्या मुख्यमंत्र्यांनी भविष्य ज्याेतिषांकडून तपासल्याच्या मुद्यावरून सुरू झालेल्या वादाबाबत ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनगटात एवढा जोर आहे की, ते दुसऱ्याला हात दाखवणार नाहीत. दुसरी बाब म्हणजे, येणाऱ्या निवडणुकीत त्यांचा हात कसा आहे, हे विराेधकांनाही कळेल. उद्धव ठाकरे यांना सध्या पश्चात्ताप होत असेल. उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपण कुठे चुकलो याचा विचार केला पाहिजे, असेही ते म्हणाले.