महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ नोव्हेंबर । मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात प्रचंड कटुता निर्माण झाली आहे. सातत्याने क्रिया आणि प्रतिक्रियांच्या अवतीभवती राजकारण फिरताना दिसत आहेत. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने नेतेमंडळी एकत्र येणार आहेत. याच लग्नसोहळ्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस आमने सामने येण्याची शक्यता आहे.
जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक आणि उद्योगपती राहुल किर्लोसकर यांची कन्या अलिका यांचा आज विवाहसोहळा होत आहे. राजारामपूर येथे सांयकाळी साडेपाच वाजता हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
विवाहसोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे, केंद्रीमंत्री नितीन गडकरी विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तर शिंदे गट आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील ठाकरेंच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. एकंदरीतच या नेत्यांमध्ये मोठी कटुता निर्माण झाली असून आज हेच नेते लग्नसोहळ्याच्या निमित्ताने आमने-सामने येणार आहेत.