महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २८ नोव्हेंबर । स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तर “स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरात लवकर व्हायला हव्यात. ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणावरील सुनावणी वारंवार पुढे ढकलत आहे.” असं म्हणत राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. आज पुण्यात माध्यमांशी ते बोलत होते.
दरम्यान, निवडणुकाच्या वादावर फक्त तारीख पे तारीख सुरू आहे. १० महिन्यानंतरही निवडणुका झाल्या नाहीत. या निवडणुका लवकर झाल्या पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. राज्यात शेतकरी, बेरोजगारी, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. त्यावर विचार व्हायला हवा असंही ते म्हणाले.
राज्यपालांचं वक्तव्य खपवून घेणार नाही
राज्यपाल कोश्यारी यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचे वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने होत आहेत. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याचं समर्थन कुणीच करू नये. राज्यपालांना पदावर बसवणाऱ्यांनी त्यांना समज द्यावी. यासंदर्भात आता वरिष्ठांनी विचार करण्याची वेळ आली आहे कारण महत्त्वाचे विषय सोडून ते वादग्रस्त वक्तव्य करत आहेत असं पवार म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत
सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमावादावरून राजकारण पेटलं आहे. तर दोन्ही राज्यात कटुता निर्माण होईल अशी वक्तव्य कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी करू नयेत. दोन्ही राज्यांनी आपापलं राज्य चालवावं असं विरोधीपक्षनेते अजित पावर म्हणाले आहेत.