BMC निवडणुकीत ठाकरेंना घेरण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा मास्टर प्लान, ‘या’ नेत्याला दिला पक्षप्रवेश

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २९ नोव्हेंबर । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात हालचालींना वेग आलाय. विशेष म्हणजे शिवसेनेच्या ठाकरे गटाला घेरण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी मास्टर प्लान देखील आखल्याची चर्चा आहे. त्याचाच पहिला भाग म्हणजे ठाकरे गटाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश! कृष्णा हेगडे यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केलाय. हेगडे यांना शिंदे गटात प्रवेश करताच उपनेते पद आणि प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आलीय.

माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे राज्याचे त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: कृष्णा हेगडे यांच्या हातावर शिवबंधन बांधत पक्षात स्वागत केलं होतं.

मुंबईतील विलेपार्ले मतदारसंघात कृष्णा हेगडे यांचं चांगलं प्रभुत्व आहे. तिथे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे शिंदे गटाला आगामी महापालिका निवडणुतकीच्या पार्श्वभूमीवर भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे.

कृष्णा हेगडे हे आधी काँग्रेसमध्ये होते. ते काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांचे समर्थक मानले जायचे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या तिकीटावर ते विलेपार्ले विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडूनही आले होते. पण काँग्रेस नेते संजय निरुपम हे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा पक्षातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला.

 

कृष्णा हेगडे यांनी संजय निरुपम यांच्यासोबत असलेल्या मतभेदांमधून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपचं कमळ हाती घेतलं. विशेष म्हणजे त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं होतं. पण भाजपात प्रवेश केल्यानंतर काही वर्षांनी त्यांचे तिथेही मतभेद झाले. त्यातून ते नाराज होते. त्यानंतर त्यांनी गेल्यावर्षी 5 फेब्रुवारी 2021 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर दीड वर्षात त्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *