बच्चू कडूंचे मोठे विधान, म्हणाले – जनाची नाही तर मनाची असावी, राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० नोव्हेंबर। ”भाजपमध्ये छत्रपतीचा अपमान करण्याची स्पर्धा लागलीय, असे संजय राऊत जे काही म्हणाले ते काही अंशी खरेच आहे. मी त्यांच्या बाजूने आहे. काही लोक आक्षेपार्ह बोलतात. कोणत्याही महापुरुषांबद्दल बोलणं उचित नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. किमान जनाची नाही पण मनाची तरी असावी” असा टोलाही राज्यपालांच्या वक्तव्यावर शिंदे सरकारमधील आमदार व प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी लगावला.

राज्यपालांनी स्पष्टीकरण द्यावे

बच्चू कडू म्हणाले, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कोणत्याही महापुरुषांबद्दल केलेले वक्तव्य उचित नाही. याचा आम्ही निषेध करतो. मात्र, प्रत्येक गोष्टीला कारवाईची गरज नसते. ज्याला त्याला ते समजायला पाहिजे. जनाची नाही तर मनाची असली पाहिजे. राज्यपाल यांच्यावर कारवाई होऊ नये असे मला वाटत नाही. त्यांनी जे बोलले असतील त्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.

फडणवीस, शिंदेंना विचारा

बच्चू कडूंना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार हा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर कडू म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न विचारा. पण दिव्यांग मंत्रालयाचे मंत्रिपद मिळाले तर आनंद द्विगुणित होईल.

उपयोग काय?

बच्चू कडू म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह कितीही शक्ती आल्या तरीही लोकांच्या मनात आस्था हवी, ती नसेल तर कितीही शक्ती जरी एकत्र आल्या तरी काहीही फरक पडणार नाही. आम्ही दिव्यांगासाठी प्रश्न मांडण्यासाठी 10 वेळा गेलो. त्यावर साधी एक बैठक झाली नाही. जनतेबद्दल आस्था नसेल तर अशा शक्त्या एकत्र येऊन उपयोग नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *