महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ डिसेंबर। महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याने कोश्यारींविरोधात सर्वच राजकीय नेत्यांनी आगपाखड केली. दरम्यान राज्यापालांविरोधात सर्वाधिक आक्रमक छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज भाजप खासदार उदयनराजे यांनी घेतली. दरम्यान यावर शिवरायांची बदनामी थांबवावी अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल अशा थेट इशारा उदयनराजे यांनी दिला होता. यावर उदयनराजे उद्या आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितल.
खासदार उदयनराजे भोसले हे साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, छत्रपतींची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे आपण व्यथित आहोत. त्यामुळेच आपण उद्या रायगडावर जात आहोत, असे सांगितले. पुढे ते म्हणाले की रायगडावर आपल्याला शिवप्रेमी मिळतील.
तिथे ते मेळाव्याला संबोधित करतील आणि त्याच वेळी ते आपली भूमिका स्पष्ट करतील, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला आहे. त्यामुळे आता उद्या रायगडावर उदयनराजे नेमके काय बोलणार, त्यांची एकूण प्रकरणावर काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
तर या दरम्यान यावेळी एका पत्रकाराने याप्रकरणावर आपली मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचे बोलले जात आहे, असा प्रश्न विचारला असता त्यांनी याचा नकार दिला. आपल्याला कोणीही फोन केलेला नाही आणि आपले कोणाशीही बोलणे झालेले नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चेचे वृत्त फेटाळले.
काय म्हणाले उदयनराजे
उदयनराजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून चांगलेच आक्रमक झाले आहेत. प्रोटोकॉल तपासून राज्यपालांवर कारवाई करणं गरजेचं असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलं आहे. मला खात्री आहे राज्यपालांवर कारवाई होईल. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माफी मागून विषय सुटणार नाही. त्यांनी राजीनामाच द्यायला हवा. माझ्यावर कारवाई करणारा जन्माला यायचा आहे. मी पक्षीय कारवाईला घाबरत नाही असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.