महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – पुणे – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – महापालिकेने जाहीर केलेल्या ६९ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये (कंटेन्मेंट झोन) सुरक्षित वावर राखला जात नसल्याने या परिसरातील दवाखाने वगळता सर्व दुकाने रविवारपर्यंत (१७ मे) पूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला आणि इतर अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा महापालिका आणि पोलिस प्रशासनामार्फत उपलब्ध करून देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे पुढील आठवडाभर कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना घराबाहेर पडण्यावर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत.
महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी रविवारी याबाबत आदेश काढले असून आज, सोमवारी (११ मे) मध्यरात्री १२ पासून ते १७ मे पर्यंत जीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रतिबंधित क्षेत्रातील मोकळ्या जागांमध्ये सुरक्षित वावर ठेवून भाजीपाला, दूध उपलब्ध करून देण्यात येईल किंवा ते घरपोच देण्यासाठी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
गेल्या रविवारीच आयुक्तांनी शहरामध्ये ६९ प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले होते. या क्षेत्रामध्ये सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, या परिसरामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या दुकानांबाहेर सातत्याने गर्दी होत असून सुरक्षित वावर राखला जात नसल्याचे चित्र दिसून आले आहे. स्थानिक दुकानदार आणि नागरिक दोघांकडून नियमांचे पालन होत नसल्याने करोनाच्या संसर्गाचा धोका कायम असल्याने त्याला आळा घालण्यासाठी ही सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून ही दुकाने बंद राहणार असून अत्यंत निकडीची परिस्थिती उद्भवल्यास महापालिका आणि पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल, असेही गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.