उदयनराजे यांच्या ‘त्या’ पत्राची राष्ट्रपतींकडून दखल; राज्यपालांच्या विधानाची चौकशी होणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ डिसेंबर। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारं विधान केल्याने खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहे. राज्यपालांना हटवण्याची मागणी करणारं पत्रं त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलं होतं. त्यांच्या या पत्राची राष्ट्रपतींनी दखल घेतली आहे. त्यामुळे राज्यपाल कोश्यारी यांच्या विधानाची चौकशी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

उदयनराजे भोसले यांनी आज राज्यपालांचा निषेध म्हणून रायगडावर आत्मक्लेश आंदोलन केलं. सकाळीच त्यांनी रायगडावर जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी आत्मक्लेश केला. त्यानंतर सभा पार पडली. यावेळी त्यांनी शिवप्रेमींशी संवाद साधत आपली भूमिका जाहीर केली.

या सभेनंतर उदयनराजे यांनी मीडियाशी संवाद साधला आणि राष्ट्रपतींनी आपल्या पत्राची दखल घेतली असून त्याचं आपल्याला उत्तर आल्याची माहिती दिली. आजच मला पत्रं आलं. त्यात माझ्या पत्राची दखल घेण्यात आल्याचं सांगितलं आहे. हे पत्र राष्ट्रपतींनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवलं आहे, अशी महत्त्वाची माहिती उदयनराजे भोसले यांनी दिली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, शिवाजी महाराजांचा सतत अपमान केल्या जात आहे. महाराजांनी जी भूमिका घेतली सर्वधर्मसमभावाची होती. त्यामागे सर्वांनी आपल्या राज्यात मोकळा श्वास घ्यायला हवा हीच महाराजांची भूमिका होती.लोकशाहीचा ढाचा त्यांनीच खऱ्या अर्थाने निर्माण केला, असं उदयनराजे यांनी भाषणात सांगितलं.

आता आपण सर्वजण प्रतिक्रियावादी झालो आहोत. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या सर्वांसाठी दिलं त्यांचा आज अपमान होत आहे. आता आपण सर्वजण काय गप्प बसणार आहोत का? असा सवालही त्यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *