महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ डिसेंबर। श्री दत्तात्रयांचे द्वितीय अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या बारा वर्षांच्या तप साधनेने पावन झालेल्या व श्री दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱया नृसिंहवाडी येथे बुधवारी (दि. 7) मुख्य मंदिरात सायंकाळी पाच वाजता श्री दत्त जन्मकाळ सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. या सोहळय़ासाठी तीन लाखांवर भाविक दत्त दर्शनाचा लाभ घेतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिर पुरातन असून, यावर्षी मंदिराला 588 वर्षे पूर्ण होत आहेत. यामुळे यावर्षी साजऱया होणाऱया श्री दत्त जन्मकाळ सोहळ्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वाभिमुख मंदिर असल्यामुळे प्रत्येक भक्ताला ‘श्रीं’च्या चरणाचे दर्शन अत्यंत सुलभतेने घेता येते.