महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा बेळगाव दौरा पुन्हा रद्द? मंत्री शंभूराज देसाई काय म्हणाले?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ६ डिसेंबर । कर्नाटक सरकारच्या (Karnataka Government) आडमुठ्या धोरणामुळे महाराष्ट्रातील मंत्र्यांचा आजचा बेळगाव दौरा (Belgaum Visit) तुर्तास रद्द करण्यात आला आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ही माहिती दिली. बेळगावच्या लोकांना भेटायचं आहेच… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज कार्यक्रम होत आहेत. या कार्यक्रमांना गालबोट लागू नये, या उद्देशानं हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

चंद्रकांत पाटील आणि मी या विषयावर चर्चा करू आणि लवकरच बेळगावमध्ये जाण्याचा दिवस निश्चित करू, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलं.
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर समन्वय साधण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शंभुराज देसाई हे दोन मंत्री बेळगावात जाणार आहेत.

दोन मंत्र्यांनी 3 आणि 6 डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या दौऱ्यांना कर्नाटक सरकारने विरोध केला. महाराष्ट्रातले मंत्री कर्नाटकात आल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनू शकतो, अशी भूमिका बसवराज बोम्मई यांनी मांडली.

तसेच सीमाप्रश्नाचा मुद्दा आमच्यासाठी केव्हाच संपला आहे. महाराष्ट्राचे आक्षेप त्यांनी सुप्रीम कोर्टासमोर नेले आहेत. त्यामुळे ही लढाई सुप्रीम कोर्टातच लढू, असंही बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केलं.

तरीही बेळगावातील मराठी भाषिकांच्या भेटीसाठी, त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी आम्ही बेळगावात जाणार आहोत, असं वक्तव्य शंभूराज देसाई यांनी केलंय. कर्नाटक सरकारच्या इशाऱ्याला आम्ही जुमानणार नाहीत, असंही देसाई म्हणाले.

दरम्यान, बेळगावला जाण्यास महाराष्ट्राचे मंत्री धजावत नाहीत, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येतेय. त्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. संजय राऊत यांनीही यावरून महाराष्ट्र सरकारवर टीका केली.

राऊत यांच्या टीकेला उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले, मीच संजय राऊत यांना आव्हान देतो. बॉर्डरला तरी शिवून यावं. आम्ही तर केव्हाही जाऊत.. पण तुम्हाला बेळगाव कोर्टानं 8 दिवसांपूर्वी बेळगावला बोलावलं. मग तुम्ही का जाऊन आला नाहीत?

तुम्ही तर मुंबईत बसूनच सांगितलं. बेळगावात गेलो तर मला अटक करतील. खोट्या केसेसमध्ये अडकवतील. तुम्ही साधं जायचं धाडसही दाखवलं नाही. मुंबईत बसूनच ओरडलात, अशी टीका देसाई यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *