महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ६ डिसेंबर। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर हक्क सांगितल्यानंतर आज मंगळवारी कर्नाटक सीमेवर कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड केली. याचे महाराष्ट्राच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले असून विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरले आहे. विरोधक आक्रमक झालेला असताना आता संभाजीराजे छत्रपती यांनीही कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
बेळगाव शहरासह जिल्ह्यामध्ये मंगळवारी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. विशेषत: निपाणी जवळील कोगनोळी टोलनाका आणि हिरे बागेवाडी जवळील हिरेबागडी टोलनाक्यावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र असे असताना देखील कर्नाटक कन्नड रक्षण वेदिकेचे अध्यक्ष नारायण गौडा आपल्या शेकडो समर्थकासह बेळगावमध्ये आंदोलन करण्यासाठी दाखल झाले. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणालाही न जुमानता त्यांनी महाराष्ट्रातून आलेल्या गाड्यांवर जोरदार हल्ला चढवला. काही गाड्यांच्या काचा फोडल्या, मार्ग काही काळापासून रोखून धरला.