तोंड आवरा, नाहीतर पुन्हा तुरुंगात आराम करायला जायची वेळ येईल; शंभुराज देसाईंचा राऊतांना सूचक इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ डिसेंबर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न सध्या चांगलाच तापला असून याच मुद्द्यावरुन ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली होती. या टीकेला शिंदे गटाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात जावे लागू शकते, असा अप्रत्यक्ष इशाराच दिला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाहक आरोप करत आहेत. त्यांनी आपले तोंड आवरावे. तुम्ही साडेतीन महिन्यांचा आराम करून बाहेर आला आहात. बाहेरचं वातावरण तुम्हाला सूट होत नाही, असे तुमच्या बडबडण्यावरून वाटत आहे. तुम्हाला पुन्हा आराम करण्याची वेळ येऊ नये. त्यासाठी अशी वक्तव्ये करणे टाळा, असा इशाराच शंभुराज देसाई यांनी दिला आहे. ते बुधवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी शंभुराज देसाई यांनी अत्यंत तिखट शब्दांत संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सुटावा, समन्वय साधला जावा, या प्रकरणात महाराष्ट्राची बाजू कशी भक्कम आहे, हे पटवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेळोवेळी दिल्लीत जाऊन प्रयत्न केले आहेत. तरी संजय राऊत हे सरकार षंढ असल्याचे म्हणतात. संजय राऊत स्वत: कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटकमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समन्स पाठवण्यात आले होते. ते पूर्ण करण्याचं धाडसही संजय राऊत यांच्यात नाही. आम्ही शेपूट घातलं म्हणणाऱ्या संजय राऊत यांना न्यायालयीन कवच असतानाही कर्नाटकमध्ये जायची हिंमत करता आली नाही. यावरून ते किती घाबरले होते, हे कळते. मग ते किती मोठे षंढ आहेत, असे आम्ही म्हटले तर चालेल का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी म्हटले.

तसेच संजय राऊत आम्ही शरद पवार साहेबांच्या नेतृत्त्वाखाली बेळगावमध्ये जाऊ, असे म्हटले. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व सोडले आहे का? राऊतांना शरद पवार हे उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मोठे वाटू लागले आहेत का, असा सवाल शंभुराज देसाई यांनी विचारला. हीच गोष्ट आम्ही शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांना सांगत होतो. संजय राऊत यांना शिवसेना पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधायचा होता, असे शंभुराज देसाई यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई दादागिरी करत असताना स्वत:ला भाई म्हणवणारे एकनाथ शिंदे काय करत आहेत. शिंदे स्वत:ला भाई बोलतात, मग आता त्यांनी कर्नाटकविरोधात भाईगिरी करुन दाखवावी. पण हे सरकार महाराष्ट्राच्या जमिनीचं रक्षण करण्यात अपयशी ठरलं आहे. त्यांना एक क्षणही सत्तेवर राहण्याचा अधिकारी नाही. गेल्या ५५ वर्षांत महाराष्ट्राने इतकं हतबल सरकार आणि मुख्यमंत्री पाहिला नव्हता. सरकारच्या दोन मंत्र्यांनी काल शेपूट घातले. हे कसले मर्द आणि स्वाभिमानी. हे तर नामर्दांचं सरकार आहे, अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *