‘सीमावादाचा प्रश्न चर्चेने सोडवा, पण जर…’ राज ठाकरेंचा कर्नाटक सरकारला स्पष्ट इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ डिसेंबर । महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर (Maharashtra-Karnataka Border Dispute) गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या संघर्षावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हा संघर्ष उफाळून येण्यासाठी राज्यातून कोण प्रयत्न करतयं का? याचा शोध घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच सीमाभागातील मराठी बांधवांवरील वाद वेळीच थांबला नाही तर जशास तसं उत्तर देण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा वाद निर्माण केला जात. मात्र यात महाराष्ट्राला नाहक त्रास सहन करावा लागतोय. सीमावादाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांना एकत्र येण्याची भूमिका घ्यावी. तसेच केंद्र सरकारनेही या प्रकणात लक्ष घालण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आहे. (Maharashtra News)

राज ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय?

मी मध्यंतरी बोललो तसं, महाराष्ट्र-कर्नाटकाचा सीमावाद उफाळून यावा, ह्यासाठी पुन्हा कोणाकडून तरी प्रयत्न सुरु झाले आहेत. तिकडून कोण खतपाणी घालतंय हे तर उघड दिसतंय, पण इथे कोण ह्याला खतपाणी घालत आहे का? हे सरकारने पहायला हवं. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडावर आवर घालावा आणि हा प्रश्न चिघळू देऊ नये. महाराष्ट्राच्या गाड्यांची तोडफोड, तिथल्या मराठी माणसांना त्रास असले प्रकार सुरु आहेत ते तात्काळ थांबवा.

हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचारानेच सुटायला हवा, पण जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर, मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय करू शकते ह्याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका. येणाऱ्या २०२३ च्या कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकांसाठी हा मुद्दा उकरून काढला जातोय आणि महाराष्ट्राला नाहक छळलं जातंय. माझं मराठी बांधवांनाही हे सांगणं असेल कि त्यांना जे हवंय ते नाही द्यायचं आपल्याला जे हवंय तेच आपण करायचं.

अचानकपणे चहुबाजुंनी राज्याच्या सीमांवर दावा सांगितला जातोय, हे प्रकरण साधं सोपं नाही, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या भूमीकडे येणारी बोटं पिरगळली जातील हे बघावं. इथे आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे विसरून, महाराष्ट्राचे आहोत हे स्मरून कृती व्हावी अशी अपेक्षा. केंद्र सरकारनेही ह्या प्रश्नात वेळीच लक्ष घालावे आणि हा वाद चिघळणार नाही हे पहावं.

मी पुन्हा सांगतो कर्नाटक आणि महाराष्ट्र ह्यांच्यात कमालीचा एकजिनसीपणा आहे, आज इथल्या अनेकांची कुलदैवतं कर्नाटकात आहेत तर अनेक कन्नडिगांची कुलदैवतं महाराष्ट्रात आहेत. थोडक्यात दोन राज्यांतील बंध हा मजबूत आहे. त्यामुळे संघर्ष होऊच नये. पण तरीही जर समोरून कर्नाटकाची भाषा निव्वळ आव्हानाची असेल तर ते स्वीकारायला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि इथली मराठी जनता तयार आहे. संघर्ष न होण्यात आणि मैत्र टिकण्यातच सर्वांचं हित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *