महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ७ डिसेंबर । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमाप्रश्नावरून वाद सुरू आहे. कर्नाटकने महाराष्ट्रातील काही गावांवर आपला दावा केल्याने हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच या वादात महाराष्ट्रातील काही वाहनांवर बेळगावमध्ये हल्ला करण्यात आला. याला प्रत्त्युत्तर म्हणून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत कर्नाटकातील बसेवर काळं फासण्यात आलं. यावरून दोन्ही राज्यांमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे. (Maharashtra-Karnataka Border Dispute)
दरम्यान, आज कर्नाटकातील कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात महाराष्ट्राविरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात त्यांनी महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. इतकंच नाही तर, त्यांनी महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान देखील दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेचं (Eknath Shinde) सरकार आहे. पण त्यांच्यात दम नाही, असं कन्नड रक्षण वेदिकेने म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील लोकांमध्ये दम असेल तर इकडे येऊन दाखवावं, नाहीतर आम्ही लाखोंच्या संख्येने तिथे येतो, आणि काय करू शकतो ते दाखवतो, असं थेट आव्हानच कन्नड रक्षण वेदिकेने दिलं आहे. आज बेळगावात कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्रविरोधात मोर्चा काढला होता. तेथील स्थानिक वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी हे आव्हान दिलं आहे. (Latest Marathi News)
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सध्या ऐरणीवर आहे. दोन्ही राज्यांमध्ये सुरू असलेला सीमावाद आता थेट दिल्लीपर्यंत पोहचला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. त्यानंतर थोड्याच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत महाराष्ट्राला डिवचण्याचं काम केलं.
दोन्ही राज्यातील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत. मात्र, कर्नाटक सीमेबाबत आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच त्याबद्दल कायदेशीर लढाई सर्वोच्च न्यायालयात लढली जाईल, असं कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं. दरम्यान, आता कन्नड रक्षण वेदिकेने महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस सरकारला थेट आव्हानच दिल्याने हा वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.