महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ डिसेंबर । छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे लोकसभेत बोलायला उभे राहिले. पण त्यांच्या ३ वाक्यानंतरच त्यांचा माईक बंद करुन पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी त्यांचा आवाज दाबला. छत्रपती शिवराय देव नाहीत पण देवापेक्षा आम्हाला कमी नाहीत. त्यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्ये करण्याची कुणाची हिम्मत होता कामा नये, असे अमोल कोल्हे सांगत असतानाच पीठासीन अधिकारी राजेंद्र अग्रवाल यांनी “हो गया हो गया…” म्हणत विषय पूर्ण करण्याची सूचना केली. त्यानंतर पुढच्याच सेकंदाला अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्यात आला. संसदेत घडलेल्या प्रकारानंतर अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.
संसेदत अमोल कोल्हेंचा 'आवाज' दाबला, छत्रपती शिवरायांवर बोलायले उभे राहिले, त्यांचा माईकच बंद केला!@kolhe_amol @NCPspeaks @mataonline #ShivajiMaharaj #WINTERSESSION2022 pic.twitter.com/uV5kmFMUjS
— Akshay Adhav | अक्षय आढाव (@Adhav_Akshay1) December 8, 2022
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशाचा आज दुसरा दिवस आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते आणि शिंदे गटाच्या नेत्यांकडून शिवरायांबद्दल अवमानकारक वक्तव्ये होत असल्याने राज्यात संतापाची लाट आहे. याचे पडसाद राजधानी नवी दिल्लीतही पाहायला मिळाले. मविआ खासदारांच्या निदर्शनानंतर आज राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी ‘शून्य प्रहारा’मध्ये शिवरायांबद्दल सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये होत असताना यासंदर्भात संसदेने खास कायदा करावा, अशी मागणी केली. पण त्याचवेळी त्यांचा माईक बंद करण्यात आला.