महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० डिसेंबर । हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात अखेरचा वन डे सामना चट्टोग्रामच्या मैदानावर रंगला. आतापर्यंत मालिकेत साधारण कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानच्या फलंदाजांसह गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली, त्यामुळे व्हाईट वॉशची नामुष्की टळली. हा सामना हिंदुस्थानने 227 धावांनी जिंकत प्रतिष्ठा राखली, मात्र पहिले दोन्ही सामने जिंकणाऱ्या बांगलादेशने मालिका 2-1 ने खिशात घातली.
प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने सलामीवीर ईशान किशनच्या द्विशतकी आणि विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या बळावर 409 धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर गोलंदाजांनी अचुक टप्प्यावर गोलंदाजी करत बांगलादेशचा डाव अवघ्या 182 धावांमध्ये गुंडाळला आणि हिंदुस्थानने 227 धावांनी विजय मिळवला. द्विशतकी खेळी करणाऱ्या ईशान किशनला सामनावीर, तर मेहंदी हसनला मालिकावीरचा पुरस्कार मिळाला.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हिंदुस्थानला शिखर धवनच्या रुपाने पहिला धक्का बसला. धवन तीन धावा करून माघारी परतल्यानंतर ईशान किशन व विराट कोहली यांनी डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. दोघांनी विरोधी संघाच्या गोलंदाजांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. ईशानने 85 चेंडूत आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. मात्र, यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत आधी दीडशतकाला आणि त्यांतर द्विशतकाला गवसणी घातली. बाद होण्यापूर्वी त्याने 131 चेंडूत 210 धावा केल्या.
दरम्यान, विराट कोहली सुरुवातीला चाचपडत खेळताना दिसला. सुरुवातीला त्याला एक जीवदानही मिळाले. त्यानंतर मात्र त्याने एकेरी दुहेरी धावांसह खराब चेंडूंचा समाचार घेत मोठे फटके मारले. त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील 44वे शतक पूर्ण करताना 11 चौकार व एका षटकार लगावला. हे शतक त्याने अवघ्या 85 चेंडूवर झळकावले. बाद होण्यापूर्वी विराट कोहलीने 91 चेंडूत 113 धावा चोपल्या.
गोलंदाजांची दमदार कामगिरी
दरम्यान, डोंगराएवढ्या आव्हानाचे ओझे घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला सुरुवातीपासून धक्के बसण्यास सुरुवात झाली. अक्षर पटलने सलामीवीर अमानुल हकला बाद केल्यानंतर बांगलादेशचा डाव सावरलाच नाही. एकट्या शाकिब अल हसन याने एक बाजू लावून धरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो 43 धावांवर बाद झाला आणि बांगलादेशचा डाव कोसळला. बांगलादेशच्या सात फलंदाजांना 20 धावांचा आकडाही पार करता आला नाही. हिंदुस्थानडून शार्दुल ठाकूर याने सर्वाधिक 3 बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि उमरान मलिकने प्रत्येकी दोन, तसेच मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि वाशिंग्टन सुंदरला एक बळी मिळाला.
हिंदुस्थानचे ‘वन डे’मधील सर्वात मोठे विजय
बरमुडाविरुद्ध 257 धावांनी विजय – 2007
हाँगकाँगविरुद्ध 256 धावांनी विजय – 2008
बांगलादेशविरुद्ध 227 धावांनी विजय – 2022