उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या तीन जणांना अटक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ डिसेंबर । लक्ष्मण रोकडे । उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री पुणे श्री चंद्रकांत पाटील यांच्यावर चिंचवड येथे शाई फेकल्याच्या कारणावरून तीन जणांवर कारवाई करून जीवितास धोका पोहोचविण्याच्या प्रयत्न केल्याच्या कलम अंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे यांच्या चिंचवड येथील निवासस्थानी सदिच्छा भेट देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री श्री चंद्रकांत पाटील हे आज रोजी आले असता पायरीवरून खाली उतरताना अचानक समोरून एक अनोळखी इसम त्यांच्यासमोर आला आणि त्याने पाटील यांच्या चेहऱ्यावर काळ्या रंगाचे द्रव्य फेकले. द्रव्य फेकणाऱ्या आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. त्यांची नावे मनोज भास्कर गरबडे वय 34, राहणार गोकुळ हॉटेल जवळ पिंपरी (समता सैनिक दल संघटक), धनंजय भाऊसाहेब इजगज वय 29 राहणार आनंदनगर चिंचवड (समता सैनिक दल सदस्य), विजय धर्मा ओव्हाळ वय 40 राहणार आनंद नगर चिंचवड (वंचित बहुजन आघाडी सचिव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

सदर इसमांवर चिंचवड पोलिस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम ३०७, ३५३, २९४, ५००, ५०१, १२०(ब), ३४, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. खराडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *