महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ डिसेंबर । भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. दरम्यान आता या वादग्रस्त विधानावरुन ठाकरे गटानेही सामनाच्या अग्रलेखातून पाटील यांचा समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? असा सवाल यात करण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात काय?
कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता. चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. चंद्रकांत पाटील यांनी आता दिलगिरी व्यक्त करून माघार घेतली. तरीही शाईफेकीचा हल्ला त्यांच्यावर झाला. महाराष्ट्रात महापुरुषांच्या बदनामीचा ‘जिहाद’ सरकारने पुकारला आहे काय? ‘लव्ह जिहाद’विरुद्ध कायदा महाराष्ट्र सरकार बनवत आहे. त्याआधी शिवराय, फुले, आंबेडकरांच्या विरोधात वळवळणाऱ्या जिभांना आवर घालणारा कायदा करा! अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.
अग्रलेखात पुढे लिहिलंय की, महाराष्ट्रात कटुतेचा स्फोट झाला आहे व या वातावरणास भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. महाराष्ट्रातले वातावरण इतके गढूळ आणि विषारी कधीच झाले नव्हते. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी येथे शाईफेक करण्यात आली. अशा घटनांचे समर्थन करता येणार नाही, पण शेवटी जे पेरले तेच उगवताना दिसत आहे. पाटील यांनी डॉ. आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासंदर्भात एक विधान केले. त्यातून हा शाईफेकीचा स्फोट झाला, पण महाराष्ट्रातील एक वर्ग वेगळेच सांगतो आहे. मिंधे गटाचे आमदार गुवाहाटी येथे कामाख्या देवीची वेगळ्या पद्धतीने पूजाअर्चा करून आले. तेथे तंत्र, मंत्र, करणी वगैरे प्रकार केले जात असल्याची वदंता आहे.
मिंधे गटाच्या लोकांनी मंदिरात जाऊन नक्की काय केले ते त्यांनाच माहीत, पण तेव्हापासून महाराष्ट्रातील भाजप मंत्री व पुढाऱ्यांची डोकी साफ भरकटून गेली आहेत. ते वेड्यासारखे बरळू लागले आहेत. मिंधे गटाने नक्की कोणाच्या विरोधात जारण-मारण केले असा प्रश्न त्यामुळे महाराष्ट्राला पडला आहे. भाजपचे राज्यपाल व मंत्र्यांनी आधी छत्रपती शिवरायांचा अपमान केला. ते वातावरण तापलेले असतानाच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून भडका उडाला. ‘त्या काळात सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी लोकांकडे भीक मागून शाळा उभारल्या. आता मात्र संस्थाचालक शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात,’ असे श्री. पाटील यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या महापुरुषांनी ‘भीक’ मागितली हे पाटलांचे विधान आता वादाचे कारण ठरले आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री त्यांच्या वाचाळकीमुळे रोजच स्वतःचे हसे करून घेत आहेत व महाराष्ट्राचीही बदनामी करीत आहेत. मिंधे गटाचे मंत्री शंभू देसाई यांनी संजय राऊत यांना सरळ धमकी दिली की, ‘तुम्ही परखड बोलणे थांबवले नाही, तर पुन्हा तुरुंगात टाकू.’ श्री. शंभू देसाई यांनी ही दमबाजी चंद्रकांत पाटील, शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल, भाजपचे आमदार यांच्यासारख्यांना केली पाहिजे. आंबेडकर, फुले, कर्मवीर पाटील यांना भिकारी म्हणणाऱ्यांना व शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना तुरुंगात पाठवू, असे हे शंभू देसाई का गर्जत नाहीत? हा प्रश्न आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते इतक्या बेतालपणे का बोलत आहेत? कामाख्या मंदिरात बळी दिलेल्या रेड्यांचे तळतळाट व शाप त्यांना लागलेत का? नपेक्षा शिकल्या-सवरलेल्या माणसांच्या डोक्यावर असा परिणाम झालाच नसता. चंद्रकांत पाटील हे तर राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आहेत. शिक्षणमंत्री म्हणून त्यांना भिकेचे डोहाळे लागले आहेत व तेच त्यांच्या मुखातून बाहेर पडत आहे. पाटील यांच्या विधानाचे पडसाद बहुजन समाजात उमटू लागले आहेत. ते पिंपरीतील घटनेवरून दिसले.