महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १३ डिसेंबर । संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी अरुणाचल प्रदेशात भारतीय आणि चिनी सैनिकांमधील चकमकीसंदर्भात लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली. राजनाथ सिंह म्हणाले की, आपल्या एकाही सैनिकाचा मृत्यू झालेला नाही किंवा कोणीही गंभीर जखमी झालेले नाही. संसदेत या संदर्भातील माहिती देण्यापूर्वी राजनाथ सिंह यांनी त्यांच्या निवासस्थानी या मुद्द्यावर बैठक बोलावली होती. या उच्चस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, सीडीएस लेफ्टनंट जनरल अनिल चौहान आणि तिन्ही सेवेचे प्रमुख एनएसए अजित डोवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तवांग येथील भारत-चीन संघर्षावर वरिष्ठ मंत्र्यांसोबत संसदेत त्यांच्या कार्यालयात बैठक घेतली.
अरुणाचल प्रदेशातील तवांग येथे चिनी सैन्यासोबत झालेल्या चकमकीच्या मुद्द्यावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दुपारी १२ वाजता लोकसभेत लेखी निवेदन वाचून दाखवले. “९ डिसेंबरला PLAच्या सैनिकांनी तवांग सेक्टरच्या यांगत्से भागात अतिक्रमण केले आणि हल्ल्याचा प्रयत्न केला. भारतीय जवानांनी हा प्रयत्न हाणून पाडला आणि खंबीरपणे परिस्थितीला तोंड दिले. आपल्या सैनिकांनी धैर्याने PLAला भारताच्या प्रदेशात अतिक्रमण करण्यापासून रोखले आणि त्यांना त्यांच्या पोस्टवर माघार घेण्यास भाग पाडले,” अशा शब्दांत राजनाथ सिंह यांनी सीमेवरील थराराची माहिती दिली.
“या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनशी चर्चा सुरू आहे. मी सभागृहाला खात्री देऊ इच्छितो की आमचे सैन्य आपल्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध आहे आणि आव्हान देण्याचा कोणताही प्रयत्न हाणून पाडण्यास तयार आहे. सीमेवर झालेल्या संघर्षामध्ये दोन्ही बाजूचे काही सैनिक जखमी झाले आहेत. मी या सदनाला सांगू इच्छितो की आमचा एकही सैनिक शहीद झालेला नाही किंवा कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. भारतीय लष्करी कमांडर्सने वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे PLAच्या सैन्याने त्यांच्या स्थानांवरूनच माघार घेतली,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
तवांगमधील चकमकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, या घटनेनंतर तेथील स्थानिक कमांडरने ११ डिसेंबर २०२२ रोजी प्रस्थापित व्यवस्थेअंतर्गत चीनच्या स्थानिक कमांडरसोबत ध्वज बैठक घेतली आणि घटनेवर चर्चा केली आहे.
“चीनी बाजूने अशी कारवाई करू नये असे सांगण्यात आले आणि सीमेवर शांतता राखण्यास सांगितले आहे. मुत्सद्दी पातळीवरही हा मुद्दा चिनी बाजूने मांडण्यात आला आहे. मी सभागृहाला आश्वासन देऊ इच्छितो की आपले सैन्य प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.