महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ डिसेंबर । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण झालेल्या महत्त्वाकांक्षी पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गावर अपघात झाल्याचे वृत्त आहे. भरघाव वेगाने जाणाऱ्या एका मर्सिडीज बेंझ कारने वायफळ टोल नाक्याजवळ स्विफ्ट कारला धडक दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या प्रकरणी अद्याप गुन्ह्याची नोंद देखील करण्यात आलेली नाही.
गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या (पहिला टप्पा) लोकार्पणाला सोहळा पार पडला. गेल्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या (पहिला टप्पा) लोकार्पणाला सोहळा पार पडला. उद्घाटनानंतर थोड्याच वेळात, ‘टाइम्स ऑफ इंडियामध्ये पुलगाव जवळील मार्गावर एका माकडाचा मृत्यू झाल्याचा फोटो प्राप्त झाला होता. वेगवान वाहनाने माकडाला धडक दिल्याने त्यात तो ठार झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागपूर-मुंबई प्रवासाचा कालावधी सध्याच्या १६ तासांवरून आठ तासांवर आणण्याच्या आश्वासनासह, या एक्स्प्रेस वेवर वाहनचालकांसाठी प्रतितास १२० किमी इतक्या वेगाची परवानगी देण्यात आलेली आहे.
आज घडलेल्या अपघातात लाल रंगाच्या स्विफ्ट कारचे मोठे नुकसान झाले आहे. मर्सिडीज बेंझ कारने या स्विफ्टकारला पाठिमागून धडक दिली आहे. या कारचा कारनंबर तपासला असता ही कार समद शेख नावाच्या व्यक्तीची आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्विफ्ट कार टोलनाक्यावर टोल भरण्यासाठी थांबली होती. त्याचवेळी भरधाव येणाऱ्या एका मर्सिडीज बेंझ कारने उभ्या असलेल्या या स्विफ्ट कारला मागून धडक दिली. मर्सिडीज बेंझ या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या अपघातानंतर दोन्ही कारचालकांनी हे प्रकरण आपसात सोडवले असल्याची माहिती हिंगणा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विशाल काळे यांनी सांगितले. त्याचमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेले नसल्याचे ते म्हणाले.
हा अपघात झाल्याचे कळताच आमचे पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मात्र या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला नाही. आम्ही या प्रकरणाबाबत स्टेशन हाऊस एंट्री करून घेतली आहे, अशी माहिती काळे यांनी दिली.