महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १३ डिसेंबर । पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे प्रवास महागला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात पेट्रोल डिझेलला पर्याय शोधला जात आहे. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतही वाढ झाली आहे. आता देशातील नामांकीत कंपनी मारुति सुझिकीने पेट्रोल डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स इंधनावर धावणारी वॅगनआर आणली आहे. या इंधनावर वॅगनआर चालवण्यास सक्षम आहे. कंपनीने आपल्या वॅगनआरचे प्रोटोटाइप मॉडेल दिल्ली येथे आयोजित SIAM (Society of Indian Automobile Manufacturers) या कार्यक्रमात सादर केले आहे. कार E20 (20% इथेनॉल असलेले पेट्रोल) आणि E85 (85% इथेनॉल असलेले पेट्रोल) मधील फ्लेक्स इंधनावर चालण्यास सक्षम आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या वॅगनआरचे अनावरण करण्यात आले.
फ्लेक्स इंधन म्हणजे काय?
पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून फ्लेक्स-इंधनाकडे पाहिले जात आहे. हे पेट्रोल आणि इथेनॉलच्या मिश्रणापासून तयार केले जाते. फ्लेक्स इंधन इंजिन पूर्णपणे पेट्रोल किंवा इथेनॉलवर देखील चालू शकतात. फ्लेक्स हा इंग्रजी शब्द flexible पासून बनला आहे. या तंत्रज्ञानावर काम करत कंपनीने वॅगनआर सादर केली आहे. ही गाडी येत्या काही वर्षात सर्वसामान्यांसाठी लाँच केली जाईल. मारुती सुझुकीच्या मते, ते इलेक्ट्रिक, हायब्रिड इलेक्ट्रिक, सीएनजी, बायो-गॅस, इथेनॉल, फ्लेक्स-इंधन यासह विविध तंत्रज्ञानावर काम करत आहे. कंपनीने मार्च 2023 पर्यंत सर्व मॉडेल्स E20 इंधन अनुरूप बनवण्याची घोषणा केली आहे.
फ्लेक्स इंधनाचे फायदे
इथेनॉल आणि मिथेनॉल ही जैव उत्पादने आहेत. ऊस, मका आणि इतर कृषी कचऱ्यापासून तयार केले जातात. त्याची किंमत देखील कमी असून कमी खर्च येईल. देशात ऊस आणि मका उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. यापासून इथेनॉल तयार केल्यास शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही सुधारू शकते. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतील अस्थिरतेचा सामना करण्यासाठी देशाने फ्लेक्स इंधन आणि ई-वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गडकरी म्हणाले की, देशातील ४० टक्के प्रदूषणाचे कारण पेट्रोल आणि डिझेलसारखे इंधन आहे.