![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । राज्याच्या विविध भागात बुधवारी मध्यरात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूरसह खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले. आता अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांसह फळबागांचेही नुकसान होण्याची भीती आहे. त्यामुळे राज्यभरातील शेतकरी पुन्हा धास्तावले आहेत.
आज पावसाची शक्यता नाही
दरम्यान, आज राज्यभरात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमानातही वाढ झाली आहे. मात्र, पावसाची शक्यता कमी असल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
राज्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ होत आहे. आजपासून राज्यात कोरड्या हवामानासह तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
तापमान 16 ते 26 अंशांच्या दरम्यान
सध्या महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी तापमान 16.5 अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान 16 ते 26 अंशांच्या दरम्यान आहे. याशिवाय पुण्यात नीचांकी तापमान 18.3, जळगावमध्ये 21.7, धुळे 19, कोल्हापूर 21, नाशिक 20.8, औरंगाबाद 18, नांदेड 21.2, उस्मानाबाद 19, परभणी 20.6, अकोला 22.6, अमरावती 20.3, बुलडाणा 21.4, निफाड 21.5, सांगली 21.3, सातारा 16.1, सोलापूर 20.5 अंश सेल्सिअस असे तापमान नोंदवले गेले आहे.
औरंगाबाद, वाशिममध्ये मध्यरात्री जोरदार
औरंगाबादेत मध्यरात्री पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. याशिवाय वाशिममध्येही रात्री उशिरा पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दोन दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत आहे. कापसाची बोंडे आता पूर्ण भरली असून ती आता केवळ काढण्याचीच प्रतीक्षा आहे. अशात अवकाळी पावसामुळे कापूस ओला होऊन खराब होण्याची भीती आहे. त्यामुळे या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
ज्वारी, हरभरा पिकांना आळीचा धोका
नंदूरबार जिल्ह्यातील नवापूर आणि शाहादा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. येथील कापूस, केळी, मिरची आणि रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील ज्वारी आणि हरभऱ्याच्या पिकांना आळीचा धोका निर्माण झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, कालपासून जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळत आहे. याशिवाय नाशिक, बदलापूर, कोकण येथेही जोरदार पाऊस बरसला आहे.
मच्छिमारांना सावधानतेचा इशारा
IMD, पुणेचे मुख्य वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांनी सांगितले की, पूर्व मध्य बंगालच्या अरबी समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र असून, त्याला लागून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या प्रणालीची तीव्रता वाढत असून, ही प्रणाली भारताच्या किनाऱ्यापासून दूर जात आहे. तर दक्षिण अंदमान समुद्रातही उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे येथील मच्छिमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.