महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ डिसेंबर । राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरूपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई आयकर विभागाने ही जप्ती हटवली आहे.
गुरू कॉमोडीटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेवरचे जप्तीचे आदेश मागे घेण्यात आले आहेत. या मालमत्तेत जरंडेश्वर साखर कारखाना, काही जमीन आणि इमारतीतील काही भाग यांचा समावेश होता. त्याचबरोबर साताऱ्यामधल्या चिमणगाव गावातल्या मालमत्तेवरची जप्तीचे आदेश देखील मागे घेण्यात आले आहेत.
आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपांखाली ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना जप्त केला होता. सातारा जिल्हा बँकेने जरंडेश्वर कारखान्याला 96 कोटींचं आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेने 225 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं.तर आयकर विभागाने तात्पुरत्या स्वरुपात जप्त केलेल्या मालमत्तेवरची जप्ती हटवली आहे.त्यामुळे अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.