“दारूगोळा साठवून ठेवतोय, प्रत्येक ठिकाणी…”, राज ठाकरेंचं सूचक विधान

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ डिसेंबर । एकीकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तुफान कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत असताना दुसरीकडे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकांसाठी शहरातलं वातावरण तापू लागलं आहे. या निवडणुकांच्या तारखा जरी अद्याप जाहीर झालेल्या नसल्या, तरी सर्वच राजकीय पक्षांनी मुंबई पालिका डोळ्यांसमोर ठेवून कंबर कसल्याचं दिसून येत आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असून ठाकरे गटासाठी फुटीनंतर ही पहिली चाचणी असेल.

या सर्व पार्श्वभूमीवर मनसेकडूनही जोरदार पक्षबांधणी केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुरुवारी संध्याकाळी विक्रोळीतील एका कार्यक्रमात बोलताना विरोधकांना दिलेला सूचक इशारा हेच अधोरेखित करत असल्याचं बोललं जात आहे. विक्रोळीतील मनसे शाखेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

काय म्हणाले राज ठाकरे?
यावेळी बोलताना राज ठाकरेंनी आपण सध्या फार काही बोलणार नसून दारूगोळा साठवून ठेवतोय, असं सूचक विधान केलं. “विक्रोळीच्या सर्व बांधवांनो आणि भगिनींने.. मी सगळ्या ठिकाणी भाषण करत नाही. कारण कधीही निवडणुका लागतील. दारुगोळा साठवून ठेवलेला बरा. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे अशातला भाग नाही. पण तुम्ही सगळे इथे आलात. फक्त तुमचं दर्शन घेण्यासाठी मी व्यासपीठावर आलोय”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“जेव्हा निवडणुका लागतील, तेव्हा मी प्रत्यक्ष आपल्यासमोर येईन आणि ज्याची जी फाडायची, ती फाडीनंच. पण सध्या तुम्ही या महोत्सवाचा आस्वाद घ्या”, अशा शब्दांत राज ठाकरेंनी जाहीर इशाराच विरोधकांना दिला आहे. त्यामुळे आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांमध्ये मनसे अधिक आक्रमक होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *