महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १६ डिसेंबर । जग आर्थिक मंदीच्या सावटाखाली असून, याचा फटका हिंदुस्थानलही बसेल. हिंदुस्थानात महागाई, बेरोजगारी आणखी वाढेल. महागाई हा विकासातील अडथळा आहे. आर्थिकदृष्टय़ा हिंदुस्थानसाठी पुढील वर्ष कठीण जाणार आहे. 5 टक्के विकासदर गाठला तरी नशीबवान समजा, असे स्पष्ट करतानाच प्रसिद्ध अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, आर्थिक विकासासाठी सुधारणा आवश्यक आहेत आणि त्यात देश कमी पडतो आहे असे त्यांनी सांगितले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानात आहे. या यात्रेत बुधवारी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्याबरोबर ते काही वेळ चालले. त्यानंतर राहुल गांधी आणि रघुराम राजन यांच्यात देशातील अर्थव्यवस्थेबाबत चर्चा झाली. वाढती बेरोजगारी, महागाई, गरीब आणि श्रीमंतांमध्ये वाढणारी आर्थिक दरी, लहान व्यवसायिकांना भेडसावणाऱया समस्या, आयात-निर्यात धोरण याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. राहुल गांधींनी यावेळी विचारलेल्या प्रश्नांना रघुराम राजन यांनी उत्तरे दिली. काँग्रेस पक्षाने हा व्हिडिओ यु-टय़ुबवर शेअर केला आहे.
आर्थिक विकासासाठी सुधारणा आवश्यक आहेत आणि त्यात देश कमी पडतो आहे.
कोरोनाकाळात उद्योग, व्यवसाय बंद पडल्यामुळे गरीब आणि श्रीमंतांमधील आर्थिक विषमता आणखी वाढली. कनिष्ठ मध्यमवर्गाला मोठा फटका बसला. श्रीमंतांवर फार परिणाम झाला नाही. गरीबांना रेशन मिळाले. मात्र, लहान-मोठे उद्योग बंद होते, बेरोजगारी वाढली, वेतन थकले. त्यामुळे कनिष्ठ मध्यमवर्गाला कोरोनात मोठा फटका बसला आहे. त्यामुळे धोरण आखताना या मध्यमवर्गाकडे बघावे लागेल. त्यासाठी धोरण आखले पाहिजे.
हिंदुस्थानची संपत्ती काही उद्योगपतींच्या हातात आहे. याकडे राहुल गांधींनी लक्ष वेधले. यावर राजन म्हणाले आपण भांडवलशाहीविरुद्ध असू शकत नाही. मक्तेदारी विरोधात असले पाहिजे. स्पर्धेसाठी सर्वांना लढावे लागणार आहे. जसा मोठा व्यवसाय चांगला आहे तसाच छोटा व्यवसायही चांगला आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
जग मंदीच्या सावटाखाली आहे. व्याजदर वाढत असल्याने विकास मंदावणार आहे. हिंदुस्थानासाठी पुढील वर्ष कठीण आहे. हिंदुस्थानात व्याजदर वाढल्याने निर्यात मंदावली आहे. बेरोजगारी, महागाई आणखी वाढेल. महागाई हा विकासाचा अडथळा आहे.
नोटाबंदीमुळे अनेक व्यवसाय बंद
नोटाबंदी केल्यामुळे अनेक उद्योग आणि व्यवसाय बंद पडले. जीएसटीमुळे अडचणी येत आहेत. यानंतरही मोठय़ा कंपन्या चांगले काम करत आहेत; परंतु छोटे व्यवसाय अडचणीत आले आहेत, असे राजन यांनी सांगितले.