महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ डिसेंबर । भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणारे माजी कर्णधार कपिल देव त्यांच्या विधानांमुळे कायम चर्चेत असतात. कपिल देव यांनी अनेकवेळा परखडपणे आपलं मत व्यक्त करत संघ व्यवस्थापन असो किंवा खेळाडूंवर निशाणा साधतात. अशातच कपिल देव यांनी भारतीय खेळाडूंबाबत बोलताना त्यांना क्रिकेट सोडून अंडी नाहीतर केळी विका असं म्हटलं आहे. कपिल देव यांचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे. (kapil dev angry on cricketers says over pressure latets marathi sport news)
मी ऐकलं आहे काही खेळाडू हे आम्ही IPL खेळतो त्यामुळे दडपण असल्याचं सांगतात. माझं अशा खेळाडूंना सांगणं आहे की तुम्ही क्रिकेट खेळू नका. तुम्हाला कोणी सांगितलंय क्रिकेट खेळायला. तुम्ही देशासाठी खेळत असता तेव्हा तुमच्यावर टीका होतेच पण त्यासोबतच कौतुकही होतं. 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशामधून 20 खेळाडू खेळतात मग कसला दबाव असतो, उलट तुम्हाला अभिमान वाटायला हवा, असं कपिल देव यांनी म्हटलं आहे.
तुम्हाला टीका सहन होत नसेल किंवा प्रेशरच येत असेल तर तुम्ही क्रिकेट सोडून अंडी किंवा केळी विका, अशा शब्दात कपिल देव यांनी खेळाडूंना झापलं आहे. कोलकातामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलतानाचा व्हिडीओ असल्याची माहिती समजत आहे. यावेळी बोलताना कपिल देव यांनी देशासाठी खेळण्यासाठी दुखापतग्रस्त आणि IPL वेळी मात्र उपलब्ध होणाऱ्या खेळाडूंवरही टीका केली.
दरम्यान, संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे राष्ट्रीय संघापासून बाहेर असतात. मात्र IPL जवळ आली की ते फिट असल्याचं दाखवू लागतात, असंही कपिल देव म्हणाले. बुमराहसारखा महत्त्वाचा खेळाडू आशिया कप आणि वर्ल्ड कपसारख्या स्पर्धांवेळी दुखापतीमुळे बाहेर होता.