महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ डिसेंबर । चीनमध्ये हाहाकार माजविणारा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट बीएफ-7 हिंदुस्थानात घुसला आहे. गुजरात आणि ओडिशात चार रुग्ण आढळले आहेत. या नव्या चिनी कोरोनाच्या आक्रमणामुळे सरकारी यंत्रणा अॅलर्ट झाली असून, बैठकांचे सत्र सुरू आहे. राज्यातही टास्क फोर्स स्थापन करण्याची तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, दोन वर्षांनंतरही कोरोना संसर्ग संपलेला नाही अशीच ही धोक्याची सूचना आहे. त्यामुळे नागरिकांसाठी पुन्हा मास्कदिन आले आहेत.
ओमायक्रॉनच्या बीएफ-7 सब व्हेरिएंटने चीनमध्ये गेल्या महिन्याभरापासून थैमान घातले आहे. रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत असून, मृतदेह ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जागा कमी पडत आहे. बिजिंगसह सर्व प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊन असून, वर्क फ्रॉम होम सुरू आहे. शाळा बंद आहेत. चीननंतर या व्हेरिएंटने अमेरिका, ब्रिटन, बेल्जीयम, जर्मनी, फ्रान्स, डेन्मार्क, जपान, ब्राझिल, दक्षिण कोरिया आणि युरोपियन देशात शिरकाव केला.