महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ डिसेंबर । पिंपरी ( लक्ष्मण रोकडे ) – अत्यंत गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींच्या ताब्यात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार केलेल्या केबल इन्टरनेट नेटवर्क देण्याचा घाट स्मार्ट सिटी प्रशासना मार्फत घातला जात आहे. भ्रष्टाचार करण्याच्या खटाटोपात पिंपरी-चिंचवड शहराची वाट लावण्याचा हा प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे.
शहरातील नागरिकांच्या खासगी आयुष्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी करुन सदर निविदा त्वरित रद्द करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या धक्कादायक प्रकाराबद्दल आपली भूमिका मांडताना अजित गव्हाणे यांनी नागरिकांच्या हितापेक्षा आपली तुंबडी भरून घेण्याच्या भाजप नेत्यांच्या स्वार्थी वृत्तीवर कडाडून हल्ला केला. अजित गव्हाणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे ६०० किलोमीटर लांबीचे अंडरग्राऊंड केबल इंटरनेट डक्ट तयार करण्यात आले. तत्कालिन महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी महापालिकेसाठी नवीन उत्पन्नाचा स्रोत म्हणून हा प्रकल्प हाती घेतला होता. महापालिकेला त्यातून भरघोस उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे अंडरग्राऊंड केबलसाठी विविध कंपन्यांकडून वारंवार होणाऱ्या रस्ते खोदाईलाही आळा बसणार आहे. डक्ट भाडेपट्ट्याने देण्यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनाने सुमारे ३०० कोटी रुपयांची एक निविदा नुकतीच प्रसिध्द केली. अवघ्या तीन कंपन्यांनी त्यात सहभाग घेतला. मेसर्स रेलटेल कॉर्पोरेशन, मेसर्स यु.सि.एन. केबल या दोन कंपन्यांशिवाय मेसर्स सुयोग टेलिमॅटिक्स लि. – मेसर्स फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या भागीदार कंपनीने निविदा भरली. सुयोग टेलिमॅटिक्स लि. फायबर स्टोरी कम्युनिकेशन प्रा.लि. या कंपनीची निविदा सर्वोत्कृष्ट ठरली आणि त्यांना काम देण्याची घाई स्मार्ट सिटी प्रशासनाकडून सुरू आहे. ज्या कंपनीकडे शहराचे पूर्ण नेटवर्क सोपविण्यात येणार आहे त्यासंदर्भात अत्यंत गंभीर मुद्दे समोर आले आहेत. असे अजित गव्हाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले.