शिर्डीच्या साईचरणी इतक्या कोटींचं दान, गेल्या वर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । शिर्डीच्या साई समाधी मंदिराच्या देणगीत मागील वर्षाच्या तुलनेत कमालीची वाढ झाली आहे. यंदाच्या वर्षभरात भाविकांनी साईचरणी जवळपास चारशे कोटींचे दान अर्पण केले आहे. दानपेटीत आज सर्व प्रकारच्या देणग्यांसह रोज एक कोटींहून अधिक दान येत आहे.यंदा एक जानेवारी ते 26 डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारात मिळून 394 कोटी 28 लाख 36 हजार देणगी मिळाली आहे. 31 डिसेंबर पर्यंतच्या देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत.

26 डिसेंबरपर्यंत प्राप्त झालेल्या देणगीचा तपशील-

दक्षिणा पेटी- 165 कोटी 55 लाख, देणगी कांऊटर- 72 कोटी 26 लाख 27 हजार, डेबीट व क्रेडीट कार्ड-40 कोटी 74 लाख, ऑनलाईन देणगी- 81 कोटी 79 लाख, चेक व डीडी- 18 कोटी, 65 लाख व मनीऑर्डर- 01 कोटी 88 लाख रुपये. याशिवाय सोने- 25 किलो 578 ग्रॅम (11 कोटी 87 लाख), चांदी- 326 किलो 38 ग्रॅम (01 कोटी 51लाख).

साईसंस्थानचे विदेशी चलन खात्याचा परवाना रिन्युएशन करणे प्रलंबित असल्याने कोट्यावधी रुपयांचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातूनही पंधरा ते वीस कोटी रुपयांची देणगी मिळत असते.

संस्थान स्थापनेचे पहिले वर्ष
साई संस्थानची स्थापना 1922 झाली यावेळी भाविकांकडून 2238 रूपये वर्गणी आली तर कायम फंडासाठी 3709 रूपये जमा झाले. 1926 च्या जानेवारीत 65 तर फेब्रुवारीत बाहेरून केवळ 25 भाविक दर्शनाला आल्याची नोंद आहे. फेब्रुवारीत दानपेटीत केवळ 43 रूपये निघाले, त्यातील रोज एक या प्रमाणे 29 रूपये संस्थाननेच टाकले होते.

आज कोट्यावधीच दान
शंभर वर्षानंतर आज रोज एक कोटींपेक्षा अधिक दान येते व संस्थानच्या तिजोरीत जमा होत आहे. 470 कोटींच्या ठेवी, 430 किलो सोने व 06 हजार किलो चांदी आहे. साईसंस्थानचे प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी सांगितले की, भाविकांकडून मिळालेल्या देणगीतून संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात.

मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दीड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *