महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू पिऊन वाहन चालवणे, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकावर वाहतूक पोलीस कडक कारवाई करणार आहेत. दोन वर्षांनंतर वाहतूक पोलीस ब्रेथअनलायझर या ब्रह्मास्त्राचा वापर करणार आहेत. 100 ठिकाणी नाकाबंदीचे पॉइंट लावले जाणार असून तेथे पोलीस ब्रेथअनलायझरचा वापर करणार आहेत.
31 डिसेंबरच्या रात्री नागरिक मोठय़ा संख्येने घराबाहेर पडतात. कोविड काळात अनेक निर्बंध असल्याने नागरिकांनी नियमांचे पालन करून घरात, सोसायटीत, टेरेसवर नववर्षाचे स्वागत केले होते, मात्र यंदा मुंबईकर मोठय़ा संख्येने 31 डिसेंबरच्या रात्री घराबाहेर पडण्याची शक्यता आहे. त्या रात्री दारू पिऊन वाहन चालविल्याने अपघाताच्या घटना घडू नयेत याची खबरदारी वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. सहपोलीस आयुक्त (वाहतूक) प्रवीण पडवळ यांनी नुकतीच वाहतूक पोलिसांची बैठक घेतली. या बैठकीत पोलिसांना बंदोबस्ताबाबत सूचना दिल्या.