टीईटी पास नसेल तर नोकरीवर येईल गदा; शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची विधानसभेत घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २९ डिसेंबर । विहित कालावधीत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सेवेतून कमी केले जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी विधानसभेत घोषित केले. टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी ज्यांना मुदत आहे, त्यांनी त्या मुदतीत ही परीक्षा उत्तीर्ण व्हावे, जे टीईटी उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांना सेवेतून काढणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केसरकर यांनी ही घोषणा केली. राज्यात संच मान्यता देण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना आहेत. ते मनाला वाटेल ते करतात, त्यासाठी नियमावली तयार करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केली. मात्र आता शिक्षक भरती पवित्र पोर्टलमार्फत होते, त्यामुळे संच मान्यतेचा विषय येत नसल्याचे केसरकर यांनी स्पष्ट केले.

पुढील वर्षापासून सकारात्मक बदल दिसतील

शिक्षण विभागात आपण अनेक चांगले निर्णय घेतले असून, त्यामुळे पुढील वर्षीपासून सकारात्मक बदल दिसेल. पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद केल्या जाणार नाहीत. गुणात्मक आणि दर्जात्मक बदल निश्चितपणे दिसतील. व्यावसायिक अभ्यासक्रम मातृभाषेतून तयार करण्याचा निर्णय आपण घेतला असून, ते काम सुरू असल्याची माहितीही केसरकर यांनी दिली.

राज्यात शिक्षक भरती लवकरच सुरू करणार

– राज्यात शिक्षक पदभरती प्रकिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध शाळांमध्ये असणारी शिक्षकांच्या रिक्तपदांची समस्या सुटण्यास मदत होईल, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी विधानसभेत दिली.

– सदस्य रईस शेख यांनी, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका शाळेतील शिक्षकांच्या रिक्तपदांच्या अनुषंगाने लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना केसरकर म्हणाले, मुंबईमध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, त्यांना भिवंडीमध्ये पाठवले जाईल. भिवंडीमध्ये पर्यायी शिक्षक उपलब्ध होईपर्यंत यापुढे बदली केली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *