महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३० डिसेंबर । विदर्भ-मराठवाड्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुुरुवारी विधानसभेत अनेक घोषणा केल्या. नागपूर-मुंबई (तूर्त शिर्डी) समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून या दोन्ही भागांचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. विदर्भासाठी पर्यटन सर्किट, नवीन खनिज धोरण, समतोल प्रादेशिक विकासासाठी नवीन समितीचा निर्णय जाहीर करतानाच ५ लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये बोनसही जाहीर केला. दोन हेक्टरपर्यंत ही मदत मिळेल.
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही विविध योजनांची अंमलबजावणी करत आहोत. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या माध्यमातून आत्महत्या कमी करण्याचा प्रयत्न आहे. तणावग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधणे, काउन्सेलिंग करण्याच्या कामात तज्ज्ञांनाही सहभागी करून घेतले जात आहे. शेतकरी सन्मान योजनेचा १३ वा हप्ता देण्याची कार्यवाही डिसेंबर ते मार्चपर्यंत केली जाईल. या योजनेतील १ कोटी ९७ लाख पात्र लाभार्थींपैकी ९२ हजार लाभार्थींचा डेटा अद्ययावत करण्यात आला असून उर्वरित ८ लाख ८ हजार लाभार्थींचा डेटा अद्ययावत करणे सुरू आहे, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विदर्भ-मराठवाड्यासाठी अनेक घोषणा
नागपूरपासून विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ विकसित करणार. यामुळे दक्षिण भारत थेट मध्य महाराष्ट्राशी जोडला जाईल.
समृद्धी महामार्गालगतच्या विदर्भ-मराठवाड्यातील धार्मिक, पर्यटनस्थळांसाठी टुरिझम सर्किट तयार करणार.
औद्योगिक विकासाला चालना. विदर्भात ४४ हजार कोटींची गुंतवणूक. ४५ हजार नवे रोजगार. सतत पावसाने पिकांच्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना ७५५ कोटींचा निधी दिला. औरंगाबादेत मोसंबी, संत्रा पिकासाठी सिट्रस इस्टेटची स्थापना. ९ कोटी २० लाखांचा खर्च केला. लोणार सरोवर पर्यटनासाठी ३६९ कोटींचा विकास आराखडा. सिंदखेडराजा येथेही विकासकामे सुरू.
तीनही वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती, नवे वस्त्रोद्योग धोरण
विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळांच्या पुनर्गठनासाठी केंद्राला विनंती
नागपूर, वर्धा येथे मोठ्या प्रमाणात लॉजिस्टिक सपोर्ट तयार होईल. नागपूर नवे लॉजिस्टिक हब असेल.
विदर्भात वस्त्रोद्योगाला अधिक वाव मिळावा यासाठी राज्यात नवे वस्त्रोद्योग धोरण पुढील ५ वर्षांसाठी आणणार.
जलपर्यटन : गोसीखुर्द येथे १०० एकर जागेवर जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पासाठी टेंडर मागवणार.
स्वदेश दर्शन : {गोसीखुर्द (भंडारा) {टिपेश्वर (यवतमाळ) {ताडोबा (चंद्रपूर) {औरंगाबाद स्वदेश दर्शन योजनेत.
प्रसाद योजना : अंचलेश्वर, कचारगड लेणी, कोराडीदेवी, नांदेड जिल्ह्यातील मंदिरांचे प्रस्ताव केंद्राच्या प्रसाद योजनेत.
कापूस आणि सोयाबीन यांच्या व्हॅल्यू चेन्स विकसित करण्यात येतील. त्यासाठी ३ हजार कोटींची तरतूद करू.
चंद्रपूर जिल्ह्यात कोळशावर आधारित हायड्रोजन, मिथेनॉल, युरिया निर्मितीच्या प्रकल्पातून १०,००० लोकांना रोजगार.
चंद्रपूर जिल्ह्यातील दोन खाणींत सोने आढळले. यामुळे विदर्भाला सोन्याचे दिवस येतील असा शिंदेंना विश्वास.