महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २ जानेवारी । महानिर्मिती आणि महापारेषणने बहुवार्षिक वीजदर निश्चितीअंतर्गत वीज आयोगाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. त्यानुसार राज्यातील वीज ग्राहकांच्या डोक्यावर प्रतियुनिटमागे सुमारे 1 रुपया 35 पैशांचा भार पडणार असल्याचा असल्याचा आरोप महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने केला आहे.
वीज कायद्यातील तरतुदींचा आधार घेत मागील चार वर्षांच्या वाढीव खर्चाबरोबरच 2023-24 आणि 2024-25 या दोन वर्षांच्या अपेक्षित वाढीव खर्चासाठी याचिका दाखल केल्या आहेत. त्यानुसार महानिर्मितीने मागील चार वर्षांतील जादा खर्च व येणाऱया दोन वर्षांतील अपेक्षित जादा खर्च यासाठी पूर्वी आयोगाने मंजूर केलेल्या रकमेव्यतिरिक्त एकूण 24 हजार 832 कोटी रुपयांच्या अतिरिक्त वाढीची मागणी केलेली आहे. सदरची रक्कम दोन वर्षांमध्ये वसुली केल्यास 1.03 रुपये प्रतियुनिट याप्रमाणे होणार आहे. त्याचबरोबर महापारेषण कंपनीने मागील खर्चाबरोबरच पुढील दोन वर्षांच्या वाढीव खर्चापोटी 7 हजार 818 कोटी रुपयांची मागणी केली आहे. त्यामुळे ग्राहकांवर प्रतियुनिटमागे 32 पैशांचा भार पडणार असल्याचा आरोप ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी केला आहे. याशिवाय महावितरणने दिलेला प्रस्ताव अद्याप जाहीर झालेला नाही, पण त्यामुळे ग्राहकांवर मोठा भार पडेल असा अंदाज होगाडे यांनी व्यक्त केला आहे.