महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ जानेवारी । भारत आणि श्रीलंका यांच्यात मंगळवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पहिला टी२० सामना खेळला गेला, ज्यामध्ये टीम इंडियाने २ धावांनी विजय मिळवत विजयाने नवीन वर्षाची सुरुवात केली. वर्षातील या पहिल्या विजयात अनेक खेळाडूंनी योगदान दिले, ज्यांनी हेडलाइन बनवले आणि त्यापैकी एक होता जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीयाकडून सर्वात जलद चेंडू देण्याचा विक्रम या वेगवान गोलंदाजाच्या नावावर आहे. त्याने भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडला आहे.
श्रीलंकेच्या संघासमोर १६२ धावांचे लक्ष्य होते. आपल्या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघासाठी उमरान मलिकने शानदार गोलंदाजी केली, त्यादरम्यान त्याने ४ षटकात २७ धावा देत २ महत्त्वाचे बळी घेतले. त्याच्या विकेटमध्ये श्रीलंकेचा स्टार फलंदाज आणि कर्णधार दासुन शनाकाचाही समावेश होता. पण दासुन शनाकाची विकेट ही केवळ सामान्य विकेट नसून चेंडूच्या वेगामुळे खास बनली आहे.
Umran Malik has a say in reply to breaking the World record of Fastest Delivery. 👀👀 #umran #umranmalik #ind #bcci pic.twitter.com/P6owMXwIUZ
— India Fantasy (@india_fantasy) January 2, 2023
उमरानच्या त्या चेंडूने जसप्रीत बुमराह याचा विक्रम मोडला गेला. त्याच्याआधी भारतीय वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम बुमराहच्या नावावर होता. बुमराहने १५३.३६ च्या वेगाने चेंडू टाकला होता. त्यानंतर मोहम्मद शमी (१५३.३ किमी प्रतितास ) आणि नवदीप सैनी (१५२.८५ किमी प्रतितास). चाहत्यांनी उमरानचे कौतुक केले आहे.
मावीने सुरुवातीलाच श्रीलंकेच्या संघाला बॅकफूटवर ढकलले होते. त्याने पहिल्या दोन षटकांत दोन बळी घेतले. यानंतर उमरानने चरिथ अस्लंकाला तंबूत पाठवले. भानुका राजपक्षे यांनाही विशेष काही करता आले नाही. श्रीलंकेने ६८ धावांत पाच विकेट गमावल्या होत्या, त्यानंतर वानिंदू हसरंगा आणि कर्णधार दासुन शनाका यांनी श्रीलंकेचा डाव सांभाळला. दोघांनी सहाव्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली.
मावीने हसरंगाला बाद केले. त्याचवेळी उमरानने शनाकाला तुफानी वेगवान चेंडूवर बाद केले. उमरानने ज्या चेंडूवर शनाकाला तंबूत पाठवले. त्याचा वेग १५५ किमी प्रतितास होता. तसेच हा सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू ठरला. उमरानच्या या वेगवान चेंडूवर शनाकाने युझवेंद्र चहलकडे झेल दिला. त्याने २७ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. या विकेटने सामन्याचे कलाटणी घेतली आणि भारतीय संघाने सामन्यावर वर्चस्व गाजवले.
जसप्रीत बुमराहचा विक्रम काढला मोडीत
उमरान मलिकने पहिल्या सामन्यात वेगवान चेंडू टाकून जसप्रीत बुमराहचा विक्रम मोडीत काढला. भारतीय गोलंदाज बुमराहचा आतापर्यंतचा सर्वाधिक वेग १५३.३६ किमी प्रतितास इतका आहे. मंगळवारी श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात जम्मू एक्सप्रेस उमरानने हा विक्रम मोडला. बुमराहच्या खालोखाल या यादीत मोहम्मद शमी (१५३.३ किमी), नवदीप सैनी (१५२.८५ किमी) यांचा समावेश आहे. लक्षणीय बाब म्हणजे उमरान मलिकने श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाला बाद करून सामना भारताच्या बाजूने फिरवला. कालच्या सामन्यात भारताकडून शिवम मावीने सर्वाधिक ४ बळी घेतले, तर उमरान मलिक आणि हर्षल पटेल यांना प्रत्येकी २-२ बळी घेण्यात यश आले.