विठुरायाचरणी नकली सोनं, चांदी अर्पण करून फेडला नवस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । मंदिरामध्ये नवस फेडण्यासाठी अनेक गोरगरीब भाविक नकली सोने, चांदीचे दागिने अर्पण करून आपापला नवस फेडताना आढळून येत असतात. यामुळे सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडे पोते भरून नकली सोने- चांदीच्या वस्तू साठल्या आहेत. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सोने-चांदीच्या अनेक वस्तू भेट येतात. यामध्ये छोट्या-मोठ्या दागिन्यांचा सहभाग असतो. या सोने-चांदीच्या अनेक वस्तू सांभाळण्यासाठी मंदिर समितीचा एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाचे काम विभागप्रमुख ज्ञानेश्वर कुलकर्णी पाहत आहेत. तसेच सोने चांदीच्या वस्तूंच्या तपासणीकरिता दत्तात्रय सुपेकर व गणेश भंडगे असे दोन सराफ मानधनावर नेमण्यात आले आहेत.

चांदीच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये पाळणे, घोडे, डोळे, निरांजन, जोडवी, पैंजण, हळदी कुंकवाच्या डब्या तबक आणि सोन्याच्या धातूसारख्या दिसणाऱ्या वस्तूंमध्ये मणी मंगळसूत्र, नथ, कानातील दागिने दानपेटीत आढळून येतात. त्या सोन्या-चांदीसारखे दिसणाऱ्या वस्तू अधिक आवश्यक नसल्यामुळे त्यांचे मोजमाप होत नाही; परंतु त्या जतन करून ठेवल्या जातात. सध्या समितीकडे नकली सोने- चांदीच्या पोतेभर वस्तू साठल्या आहेत.

दानपेटीत आढळली नकली चांदी

बऱ्याचशा सोने-चांदीसारख्या दिसणाऱ्या सेम टू सेम वस्तू या दानपेटीत आढळून आल्या आहेत. दानपेटीबरोबर भाविकांनी विठोबाच्या चरणांवर अर्पण केलेल्या वस्तूंमध्ये नकली चांदी आढळून आल्याचे आढळून आले असल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.

अशी ओळखली जाते नकली चांदी

मंदिरात अर्पण केलेल्या सोने- चांदीच्या भेटवस्तूंची तपासणी करता सोने किंवा चांदीचा धातूवर तेजाब (ॲसिड) व मीठपाणी असे द्रव्य टाकण्यात येते. त्यातून नकली वस्तू समोर येतात, अशी माहिती दत्तात्रय सुपेकर यांनी दिली.

चांदी-सोने नव्हे, व्हाइट मेटल व बेन्टेक्स

चांदीच्या म्हणून व्हाइट मेटलच्या व सोने म्हणून बेन्टेक्सच्या वस्तू भाविक मंदिराच्या दानपेटीत अर्पण करत आहेत. दानपेटीमध्ये टाकण्यात आलेल्या वस्तूंमध्ये व्हाइट मेटल व बेन्टेक्सच्या वस्तूंची अधिक संख्या होती.

भाविकांनी खबरदारी घ्यावी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला दान करण्यासाठी सोने- चांदीचे दागिने घेताना विश्वसनीय सराफाकडून खरेदी करून घ्यावेत. त्याचबरोबर त्याची पावतीदेखील घ्यावी. यामुळे भाविकांची फसवणूक होणार नाही. सोने- चांदी खरेदी करताना भाविकांनी काळजी घ्यावी. बालाजी पुदलवाड, व्यवस्थापक, मंदिर समिती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *