Anil Parab: अनिल परब यांच्या अडचणीत वाढ ; ईडीनंतर आता म्हाडा कारवाई करणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ जानेवारी । राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena Thackeray Faction) नेते अॅड. अनिल परब (Anil Parab) यांना आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बुधवारी ईडीने (ED) साई रिसॉर्ट (Sai Resort) प्रकरणी 10 कोटींच्या संपत्तीवर तात्पुरती टाच आणल्यानंतर आता म्हाडादेखील (Mhada) कारवाई करण्याची शक्यता आहे. वांद्रे येथील अनिल परब यांच्या कार्यलयावर म्हाडाकडून हातोडा चालवण्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे वांद्रे परिसरातील म्हाडा कॉलनी इमारत क्रमांक 57 आणि 58 या ठिकाणी कार्यालय आहे. हे जनसंपर्क कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्यात यावे अशा आशयाचे पत्र भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हाडाला दिले आहे. या प्रकरणात काही वर्षांपूर्वी किरीट सोमय्या यांनी हे कार्यालय अनधिकृत असून ते पाडण्याची मागणी करणारी याचिका लोकायुक्तांपुढे सादर केले होती. त्यापूर्वी विलास शेगले या व्यक्तीने देखील म्हाडाकडे तक्रार करून हे बांधकाम पाडण्यात यावं अशी मागणी केली होती.

या तक्रारीनंतर म्हाडाच्या मिळकत व्यवस्थापकांनी अनिल परब यांना 27 जून व 22 जुलै 2019 रोजी दोन वेळा नोटीस बजावून बांधकाम पाडण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु त्यावेळी अनिल परब यांना बांधकाम पाडलं नाही. त्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार पायउतार झाले. त्या दरम्यानच्या काळात ‘म्हाडा’कडून ते बांधकाम पाडण्यात आले नव्हते.

दरम्यानच्या काळात अनिल परब यांच्यावतीने हे बांधकाम अधिकृत करण्यात यावं अशा पद्धतीचा प्रस्ताव म्हाडाला देण्यात आला होता. मात्र म्हाडाने हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यानंतर आता सरकार बदलल्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा हे बांधकाम पाडण्यात यावं अशा पद्धतीचे पत्र म्हाडाला लिहिल आहे. त्यामुळे या पत्रानंतर म्हाडाकडून काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

ईडीकडून परब यांच्यावर कारवाई
दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आलीय. ईडीने दिलेल्या माहितीनुसार 10. 20 कोटी रूपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीय. ईडीने ट्विट करून याबाबतची माहिती दिली. मात्र, या मालमत्तेशी आपला काहीही संबंध नसल्याचे अॅड. अनिल परब यांनी म्हटले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *