महाराष्ट्रात एवढे प्रश्न, मात्र राऊत काय बोलले, राणे काय बोलले हेच सुरू ; राज ठाकरेंनी माध्यमांचे कान टोचले

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ जानेवारी । महाराष्ट्रात एवढे प्रश्न आहेत. मात्र माध्यमांत राणे काय बोलले, राणे काय बोलले, हेच सुरू आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज माध्यमांचेच कान टोचले.

केवळ क्रिया आणि प्रतिक्रिया

पुण्यात सुरू असलेल्या 18व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. राजकारण दिशाहिन झाल्याचे चित्र आहे. माध्यमांमध्येदेखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलीकडे काहीच दिसत नाही.

म्हणून मी काही बोलत नाही

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहे. कोणी कशावरही बोलायला लागले आहेत. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सर्व टीव्हीवर दाखवले जात आहे.

राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात एवढे प्रश्न असूनही राणे काय बोलले, राऊत काय बोलले, हेच सुरू आहे. शरद पवार मध्येच येतात आणि बोलतात. त्यामुळेच मी आता काहीही बोलत नाही.

उद्योग गेल्याने फरक पडत नाही

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवरही राज ठाकरेंनी भाष्य केले. राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातून एखाद दुसरे उद्योग इतर राज्यात गेल्याने काही फरक पडत नाही. दर्या मे खसखस. महाराष्ट्राने आहे ते टिकवून ठेवले तरी महाराष्ट्र नेहमीच पुढे राहील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राज ठाकरेंनी टीका केली. राज ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाकडे लक्ष दिले पाहिजे. आपण गुजरातचे आहोत, म्हणून केवळ गुजरातला प्राधान्य देणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही.

सोशल मीडियात मजा नाही

मुलाखतीत राज ठाकरे यांना ‘तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार म्हणून वारसदार म्हटलं?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर ‘बाळासाहेब ठाकरे मला त्यांचा व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटले हे आता मला त्यांना विचारता येणार नाही’, अस मिश्किल उत्तर राज ठाकरेंनी दिले. यावर सभागृहात एकच हशा पिकला.

आता व्यंगचित्र का काढत नाहीत?, या प्रश्नावर राज ठाकरे म्हणाले, व्यंगचित्र काढल्यानंतर ते सोशल मीडियावर टाकणे मला आवडत नाही. मी सुरुवातीला प्रिंट मीडियात काम केले आहे. त्यामुळे सकाळी वृत्तपत्रात छापून येणाऱ्या व्यंगचित्राची जी मजा आहे, ती सोशल मीडियावर नाही. मला एकदा कोणती तरी एकदा व्यंगचित्राखाली लोकांनी केलेल्या कमेंट दाखवल्या होत्या. त्याखाली अनेकांनी ‘जय मनसे’, ‘जय महाराष्ट्र साहेब’ अशा कमेंट केल्या होत्या. पण त्याला व्यंगचित्र कळतं का? हा प्रश्न जास्त महत्त्वाचा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *