महाराष्ट्र24 – पिंपरी – दि.8 जानेवारी- पुणे-नाशिक महामार्गावरील मोशी येथे असलेला टोलनाका काही महिन्यांपूर्वी बंद केला होता. मात्र, पुन्हा हा टोल सुरू केला असून, सामान्य वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांकडून वसुली सुरू केली आहे. याचा निषेध करीत संबंधित टोल वसुली तात्काळ बंद करावी. त्यासंदर्भात दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी दुपारी बारा वाजता रास्ता रोको आंदोलन करुन मोशी टोल नाका फोडण्यात येणार आहे, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी दिला आहे. याबाबतचे निवदेन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ईमेलद्वारे पाठविण्यात आले आहे.
मोशीतील इंद्रायणी नदी पुलाजवळ असलेला मोशी पथकर वसुली टोलनाका काही महिन्यांपूर्वी मुदत संपल्याने बंद केला होता. मात्र, सदर टोलनाका पुन्हा सुरू करुन वाहनचालकांकडून वसुली सुरू केली आहे. मोशी आणि चांडोली टोलनाका येथे सुधारित पथकर लागू करण्याबाबत प्राधिकरणाने 5 जानेवारी रोजी सूचना जारी करण्यात आली आहे.
वास्तविक, पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडीने वाहन चालक त्रस्त आहेत. यामध्ये आता नागरिकांना आर्थिक भुर्दंडदेखील सोसावा लागणार आहे. त्यामुळे वाहन चालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. टोलनाक्यांवरील रांगांमुळे मोशीतून अवघ्या सहा सात किलोमीटर असलेल्या चाकणला किंवा चार किलोमीटरवर असलेल्या भोसरी, नाशिक फाट्याला जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तासाचा वेळ लागतो. रस्त्याचे रुंदीकरण न झाल्यामुळे अनेक वर्षे वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. टोल नाका बंद झाल्याने मध्यंतरी काही काळ वाहतूक सुरळीत झाली होती. मात्र, आता पुन्हा टोल वसुली सुरू झाल्याने नागरिकांना वाहतूक कोंडी आणि आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. त्यामुळे हा टोल कायमचा बंद करावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.
**
प्रतिक्रिया :
पुणे-नाशिक महामार्गावर मोशी येथे पथकर वसुली टोलनाका पुन्हा सुरू करण्यात आला असून, स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून टोल वसुली केली जात आहे. मात्र, यामुळे वाहनचालकांना नाहक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. स्थानिक नागरिकांच्या वाहनांना २० किलोमीटर प्रवासाचा सवलतीचा ३१५ रुपये किमतीचा मासिक पास घ्यावा लागणार आहे. याबाबत जाहीर प्रकटन प्राधिकरणाने प्रसिद्ध केले आहे. पुढील एक वर्षासाठी हे दर असणार आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रशासनाप्रति संताप आहे. त्यामुळे टोलवसुली तात्काळ बंद करण्याचा निर्णय घ्यावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा मोशी टोलनाक्याची तोडफोड करण्यात येईल.
-सचिन काळभोर, सामाजिक कार्यकर्ते