Weather Alert : महाराष्ट्रात पुढचे २ दिवस थंडीचे ; पुण्यासह हे २ जिल्हे गारठणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ जानेवारी । राज्यात यंदा थंडीच नाही असं अनेकजण म्हणत असले तरी बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कडाक्याचा गारवा पाहायला मिळत आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. पुढच्या २ दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनाही आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी एक अंकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुढच्या २ दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्रातील काही शहरं, मराठवाडा तसेच विदर्भातही तापमानात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, धुळे, सोलापूर, नाशिक, परभणी या जिल्ह्यांमध्ये थंडी वाढण्याचा अंदाज आहे.
ADV- तुमचा ख्रिसमस खास बनवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे

दरम्यान, धुळे शहर परिसरात आज सकाळी किमान तापमानात चांगलीच घट झाली. आज किमान तापमान ५ अंश इतके नोंदवले गेले आहे. त्यामुळेच धुळेकर वाढत्या थंडीने चांगलेच गारठल्याचे चित्र पहायला मिळाले. शहराचे किमान तापमान रविवारी ८.६ अंश सेल्सिअस एवढे नोंदवले गेले. शनिवारी किमान तापमान ७ अंश एवढे होते. गेल्या चार दिवसांपासून धुळे शहर परिसरात धूक्याची चादर दररोज सकाळी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जनजीवनावर सुद्धा मोठा परिणाम झाला आहे.

औरंगाबादमध्येही एका दिवसात तापमान तीन अंशांनी घसरलं आहे. रविवारी तापमान ९.४ अंश सेल्सियसवर असल्याची नोंद चिखलठाणा वेधशाळेने नोंदविली आहे तर पुढील तीन दिवस थंडीचा कडका कायम राहणार असल्याची माहिती आहे. हिंगोलीतही पारा घसरला असून गुलाबी थंडीने नागरिकांना हुडहुडी भरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *