महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ९ जानेवारी । एअर इंडियाच्या विमानामध्ये एका प्रवाशाने महिलेच्या अंगावर लघुशंका केल्याचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. अशातच आता आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. यात इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाईटमध्ये एक अजब घटना घडली. दिल्लीहून पाटणामध्ये येत असलेल्या इंडिगोच्या फ्लाईटमध्ये नशेत असलेल्या ३ तरुणांनी एअर होस्टेससोबत गैरवर्तन केलं. तीन आरोपी प्रवाशांची एअरहोस्टेससोबत बाचाबाची झाली.
एअर होस्टेससोबत झालेल्या भांडणाची माहिती विमानाच्या कॅप्टनला मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. तिन्ही आरोपी प्रवाशांनी एअर होस्टेससोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना दिल्लीहून पाटण्याला येत असताना घडली. पाटणा विमानतळावर विमान उतरवल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती तातडीने सीआयएसएफला देण्यात आली. पाटणा पोलिसांनी घटनास्थळ गाठून 2 जणांना ताब्यात घेतलं.
सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. विमानतळाबाहेर पडल्यानंतर यातील एक तरुण पळून गेल्याचंही सांगितलं जात आहे. त्याचीही ओळख पटवली जात आहे. या संपूर्ण प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सध्या दोन्ही आरोपी प्रवाशांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांच्याकडून घटनेची अधिक माहिती गोळा करण्यात येत आहे.