Yogesh Kadam: आमदार योगेश कदमांच्या कारला धडक देणारा ट्रकचालक पोलिसांच्या ताब्यात; कबुली देत म्हणाला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । तीन दिवसांपूर्वी शिंदे गटाचे जेष्ठ नेते रामदास कदम यांचा मुलगा आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला पोलादपूर नजीक कशेडी घाटात चोळई येथे हद्दीत अपघात झाला होता. त्यांच्या गाडीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली होती. या डंपरचा चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला होता. त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

हा डंपरचालक आरोपी उत्तरप्रदेश येथील जनाडी बलिया गावातील आहे. अकलेश नरसिंग यादव असं त्याचं नाव आहे. याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले आहे. गाडीचे ब्रेक लायनर जाम झाल्यामुळे ब्रेक लागला नाही. त्यामुळे माझा डंपरवरील ताबा सुटला आणि अपघात झाला, अशी कबुली अकलेश यादवने जबाबात दिली आहे.

आमदार योगेश कदम यांच्या गाडीला ६ जानेवारीला रात्री १०.१५ च्या सुमारास पोलादपूर जवळील कशेडी घाटात चोळई येथे अपघात झाला होता. या अपघातात सुदैवाने आमदार योगेश कदम यांना कुठलीही दुखापत झाली नव्हती. त्यांच्या चालक व दोन पोलीस या घटनेत जखमी झाले होते. रायगड पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.

या अपघातानंतर डंपरचा चालक फरार झाला होता. यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. योगेश कदम यांच्या गाडीच्या अपघात होता की घातपात, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *