महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । मागच्या मागच्या दोन दिवसांपासून थंडी वाढत असल्याचे दिसून येत आहे. राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामानविभागाने वर्तवली आहे. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकच्या काही भागात थंडीची लाट ते तीव्र शीतलहरी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे. तर पुणे, नगर जिल्ह्यांतील काही भागात थंडीची दाट लाट येण्याची शक्यता आहे. याचबरोबरऔरंगाबाद, जालना, बीडसह मराठवाडा, विदर्भातील काही भागात थंडीची लाट शक्य आहे. तसेच कोल्हापूर सातारा आणि मुंबईमध्ये पारा 10 ते 15 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
भारताच्या उत्तरेत म्हणजे काश्मीर, लडाख, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश तसेच राजस्थानात पश्चिमी चक्रवात झाल्यामुळे थंडी कमी-अधिक होत आहे. मागच्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घसरण झाल्याने आणि दाट धुके पसरल्याने कडाक्याची थंडी महाराष्ट्रातील काही भागात पडत आहे. दरम्यान मागच्या 24 तासांत थंड वाऱ्याचा वेग कमी होता तर दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत होता. पण रात्री तापमान कमालीचे घसरले होते दरम्यान पुढचे दोन दिवस हेच चित्र राहण्याची शक्यता आहे.
पुणे …आता 12 वा, रात्री चे तापमान …
10.8 ° पाषाण
अजून एक गार पहाट, एक अंकी तापमानाची …
काळजी घ्या प्लीज. pic.twitter.com/xOTGBwVuOw— K S Hosalikar (@Hosalikar_KS) January 9, 2023
काश्मिरातील बर्फवृष्टी, उत्तर भारतातून एकापाठोपाठ आलेले दोन्ही पश्चिमी चक्रवात यामुळे (दि.09) महाराष्ट्रातील सुमारे 13 जिल्ह्यांतील किमान तापमानात 5 ते 6 अंशांनी घसरले होते. राज्यातील 19 महत्वाच्या शहरांतील किमान तापमान 10 अंशांपर्यंत नोंदवण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर येथे सर्वात नीचांकी 4.7, निफाड, जळगाव, धुळ्यात 5 अंश एवढे तापमान नोंदले गेले.
औरंगाबादेत 55 वर्षांनंतर सर्वात कमी 5.7 अंश नोंद झाली. यापूर्वी 1968 मध्ये 5.2 अंश, यानंतर 29 डिसेंबर 2018 रोजी 5.8 नीचांकी तापमान होते. याचबरोबर सोमवारी 8.7 अंशांपर्यंत पारा घसरल्याने नाशिकमध्ये सकाळी उशिरापर्यंत दाट धुक्याची चादर होती. अशीच परिस्थिती पुढचे दोन दिवस राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान सरासरीपेक्षा 2 ते 3 अंशांनी आणखी घसरण्याची शक्यता आहे. मुंबई तसेच कोकण वगळता संपूर्ण राज्यात 19 जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे, अशी माहिती हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
धुक्यामुळे विमान सेवेवर परिणाम
धुक्यामुळे उत्तर भारतातून मुंबई, पुण्याकडे येणाऱ्या रेल्वेंचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने कर्नाटक एक्स्प्रेस ८ ते ९ तास, सचखंड आणि पंजाब मेल सरासरी ३ तास विलंबाने धावत आहे. सोमवारी १३ गाड्या लेट होत्या. तसेच नाशिक- दिल्ली विमान धुक्यामुळे १ तास १५ मिनिटे विलंबाने उडाले.