महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १० जानेवारी । शिवसेनेसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आणि निर्णयाक आहे. आज सर्वोच्च न्यायालयापाठोपाठ आज निवडणूक आयोगामध्येही सुनावणी होणार आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोन्ही गटापैकी कोणाला मिळणार? या संदर्भात निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह वेगळा गट स्थापन केल्यापासून शिवसेना राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हं कोणत्या गटाचे आहे, यावर अद्यापही कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आयोगाच्या या सुनावणीकडे सुद्धा लक्ष लागलेले आहे. दोन्ही गटांनी शिवसेनेवर दाव्यासाठी 20 लाखांवर कागदपत्रे सादर केली आहेत.
आतापर्यंत कुणी किती कागदपत्रं सादर केली?
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
प्रतिज्ञापत्र 3 लाख (जिल्हा प्रमुख ते गटप्रमुख)
प्राथमिक सदस्य 20 लाख
एकूण कागदपत्र – 23 लाख 182
बाळासाहेबांची शिवसेना
खासदार – 13
आमदार – 40
संघटनात्मक प्रतिनिधी – 711
स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी – 2 हजार 46
प्राथमिक सदस्य – 4 लाख 48 हजार 318
शिवसेना राज्यप्रमुख – 11
एकूण कागदपत्र – 4 लाख 51 हजार 139
या 16 आमदारांना नोटीस
महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात सत्तानाट्य सुरू असताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी गुवाहाटीला गेलेल्या 16 आमदारांना तुमच्यावर कारवाई का करू नये? याबाबत 48 तासात उत्तर द्यायची नोटीस पाठवली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे, अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, यामिनी जाधव, संदीपान भुमरे, भरत गोगावले. संजय शिरसाट, लता सोनावणे, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, बालाजी कल्याणकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमुलकर, रमेश बोराने आणि चिमणराव पाटील या 16 आमदारांना ही नोटीस पाठवण्यात आली होती.
आमदारांना नोटीस पाठवण्यात आल्यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. विधानसभा उपाध्यक्षांवर अविश्वासाचा ठराव आला असल्यामुळे ते आम्हाला अशी नोटीस पाठवू शकत नाहीत, असा दावा शिंदे गटातल्या आमदारांनी केला, यानंतर सुप्रीम कोर्टाने आमदारांच्या निलंबनाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे आदेश दिले होते. या प्रकरणी आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.